सुट्टीवर आलेले मुख्यमंत्री रमले शेतात;
मुख्यमंत्री नसताना वारंवार ते आपल्या गावी येऊन शेतीची पाहणी करायचे. कोयना धरणामुळे या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. तरीही या दुर्गम गावात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेती फुलवली आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा दरे या गावी आले होते.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कोणताही बंदोबस्त न घेता दोन दिवस वेळ काढून ते गावात थांबले. शेतीची पाहणी केली आणि कोळपणी देखील केली. त्याचबरोबर स्ट्रॉबेरी पिकांची लागवड करत गवती चहा, हळद आणि चंदनाच्या झाडांची पाहणी केली. शेततळ्यातील माशांना खाद्य घातले. स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून गावातील शेती विकासासाठी काय करता येईल, याची देखील त्यांनी चर्चा केली.
दरम्यान, माझा जन्म इकडेच झाला असून आपल्याला शेतीची आवड असून माझे आजोबा, वडील शेतकरी आहेत. आमचं सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. मी जेव्हा गावी येतो तेव्हा झाडे लावणं, शेतीची मशागत करणं, असे अनेक कामं करत असतो. मी माझ्या आजोबांबरोबर, वडिलांसोबत शेतीत काम केल आहे, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आता मुलगा श्रीकांतही यामध्ये सहभागी होतो. श्रीकांतने इकडे खूप वेगवेगळ्या पिकांची लागवड केली. त्यामध्ये हळद, अनेक औषधी वनस्पतीची लागवड केली असून काजू, आंबे, मोसंबी, संत्रा, अशी अनेक फळांची देखील लागवड केल्या आहे, असे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची आणि त्यांच्या साधेपणाची चर्चा मात्र चांगलीच होत आहे.