अटकेत असलेल्या आव्हाड यांना हायपर टेन्शन चा त्रास ; केले रुग्णालयात दाखल;
डॉक्टरांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर उपचार करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ठाणे शहरातील एका मल्टिप्लेक्समध्ये घुसून 'हर हर महादेव' चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणल्याची घटना घडली होती. चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्यावर आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यापैकी काहींना मारहाण केली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण केला.
हा वाद नेमका काय आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटावर टीका केली होती. "हर हर महादेव, या सिनेमात विकृतीचा एक वेगळाच कळस गाठला गेला. बाजीप्रभू देशपांडे चक्क महाराजांचे एकेरी नाव घेत त्यांच्याशी युद्ध करत आहेत.
एका स्वामीनिष्ठ मावळ्याचा हा केवढा अपमान आहे! या सिनेमात बाजीप्रभू ही व्यक्तिरेखा खुद्द महाराजांपेक्षाही मोठी दाखवली आहे. महाराजांना प्रत्येक गोष्ट जणू काही बाजीप्रभूच शिकवत होते आणि महाराजांना, जिजाऊंना किंवा इतर दरबारी लोकांना काहीच माहीत नव्हते इतक्या दर्जाचा हा विपर्यास आहे. अफजलखानाचे पोट फाडताना महाराज खानाला मांडीवर घेतात, का तर महाराज हे नृसिंहअवतार वगैरे आहेत असे सुचवायचे आहे," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.