पंढरपूरचं विठ्ठल मंदिर राहाणार २४ तास खुलं कार्तिकी यात्रेसाठी काढला देवाचा पलंग,
कार्तिकी एकादशी जवळ आली आहे.
आषाढी आणि कार्तिकी एकदशीत पंढरपूर अक्षरश: लाखो वारकऱ्यांनी दुमदुमून निघतं.
अशात आज पंढरीच्या विठूरायाचा पलंग काढण्यात आला आहे, याचा अर्थ म्हणजे आता कार्तिकी एकदशीनिमित्त पंढरीच्या रायाचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांना घड्याळ पाहाण्याची गरज नाही.
आजपासून देवाचा पलंग काढण्यात आला आहे त्यामुळे आता वारकरी कोणत्याही मिनिटाला पंढरीच्या पांडूरंगाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.देवाचा पलंग काढणे म्हणजे काय?आषाढी आणि कार्तिकी एकदशीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर इथं दाखल होत असतात.
काही भाविकांना मंदिराच्या नियोजित वेळेनंतर मंदिर बंद झाल्याने दर्शन न घेताच माघारी परतावे लागते.
अशात पंढरपूरला येऊनही विठूरायाचं दर्शन घेता आलं नाही म्हणून हिरमुसलेले अनेक चेहरे पाहायला मिळतात.
मात्र कार्तिकी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठूराया आपल्या लाखो भक्तांना भेटण्यासाठी सदैव तत्पर असतो.
त्यामुळे देवाचा विश्रांती घ्यायचा पलंग काढला जातो.
ज्याला देवाचा पलंग काढणे असं म्हणतात.
हा पलंग एकदा काढला की पंढरपूर इथं विठ्ठलाचं दर्शन या लाखो वारकऱ्यांना घेणं शक्य होतं.देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याचसाठी दर्शन बंद राहणार असून उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे.
त्या दरम्यान विठ्ठल आणि रुक्मिणीला लोड लावण्यात येतो.
चोविस तास भक्तांच्या सेवेत उभं राहिल्याने देवाला थकवा जाणवू नये म्हणू मऊ कापसाचा लोड देवाच्या पाठीला आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला आहे.मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर , माधवी निगडे , शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते पूजेनंतर हा लोड लावण्यात आला.यंदा करोनानंतर ही पहिलीच कार्तिकी एकदशी असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे.
यात्रा काळात तासाला अडीच ते तीन हजार लोकं देवाच्या पायावर आपलं डोकं ठेवू शकणार आहेत.