सुवर्णपदक विजेता चि. राहुल धोत्रे या युवकाचा मा. उमेशराव परीचारक यांनी केला यथोचित सन्मान
प्रतिनिधी: (नागेश काळे) पंढरपुर शहराचा सुपुत्र चि. राहुल बळी धोत्रे या युवकाने मुंबई येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अथलेटिक्स या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भालाफेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे. व आता या युवकाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. राहुल धोत्रेच्या या कामगिरीची व कर्तृत्वाची दखल घेत मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाड्यात सन्मानाने आमंत्रित करत पांडुरंग परिवार व विशाल आर्वे मित्रमंडळाच्या वतीने युटोपियन शुगरचे चेअरमन मा. उमेशराव परिचारक यांचे शुभहस्ते राहुलचा यथोचित सन्मान करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी मा. उमेशराव परिचारक यांनी राहुलला मनःपूर्वक शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना विशाल आर्वे म्हणाले, "अत्यंत विपरीत परिस्थितीत घरात क्रीडा क्षेत्राचे कसलेही वातावरण नसताना, तसेच वडील गवंडी काम करत असल्याने आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची असलेल्या राहुलने संपादन केलेले हे यश खुपच कौतुकास्पद आहे. राहुल धोत्रे म्हणजे आपल्या पंढरपूर शहराचा हिरा असून, पंढरपुरकर या नात्याने या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. व या कर्तव्याच्या भावनेतूनच राहुलला पुढील काळात क्रीडा क्षेत्रात प्रगती करत असताना आर्थिक अथवा अन्य कोणतीही समस्या आल्यास पांडुरंग परिवाराच्यावतीने तत्परतेने सहकार्य केले जाईल." याप्रसंगी अनिकेत देशपांडे, झहीर बागवान, गणेश देशपांडे, आकाश आर्वे, सोमेश मरळे, सारंग दिघे, प्रितम भोसले आदी सहकारी उपस्थित होते.