अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावातील प्रशांत मेशरे याचा बुधवारी मृत्यू झाला. तो होमगार्ड म्हणून काम करत होता. मात्र, काही दिवसांपासून त्याची तब्येत बरी नव्हती. अखेर डॉक्टरांनी बुधवारी त्याला मृत घोषित केले. अवघ्या २५ वर्षांचा तरुण कोवळ्या वयात गेल्याने कुटुंबासह गावातील लोकांनीही हळहळ व्यक्त केली. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात जात असतानाच तिरडी हलू लागली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिरडी मंदिरात थांबवली. तेवढ्यात प्रशांत उठून बसला. मृतदेह अचानक तिरडीवरच उठून बसल्याने एकच कल्लोळ माजला. मृत झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला हे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक येऊन पाहू लागले. मंदिर परिसरात एवढी गर्दी जमली की जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात करावे लागले. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रशांत मेशरे याचा वैद्यकीय अहवाल पुन्हा तपासण्यात येणार असून त्याच्या वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रशांत होमगार्ड म्हणून काम करत होता. तसंच, त्याचा तंत्रमंत्राचाही अभ्यास होता, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच हा चमत्कार असून त्याच्या अंगात देव आहे, अशी समजूत ग्रामीण भागातील लोकांनी करून घेतली आहे.