सोलापूर येथील धर्मवीर तलाव मध्ये दहा वर्षानंतर पाच प्रकार चे बोटींग सुरू।
तलावात आठ बोटी दाखल झाल्या असून आता रायर्डसची प्रतीक्षा आहे. सध्या तलावातील पाण्याची चाचणी सुरू आहे. महिनाअखेरपर्यंत बोटिंगची सुविधा नागरिकांच्या सेवेत असणार आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेंतर्गत १२ कोटी रुपये खर्चून धर्मवीर संभाजी तलावाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. तलाव शुद्धीकरण, तलाव परिसरातील स्थापत्य कामे, सांडपाण्यावरील प्रकिया व परिसरात आकर्षक सुशोभीकरण आदी कामांचा यात समावेश आहे. त्यात पर्यटनवाढीच्या दृष्टीने बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देत या परिसराची शोभा आणखीन वाढविण्यासाठी महापालिका भूमी व मालमत्ता विभागाने बोटिंगसाठी निविदा काढली होती. दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली बोटिंगची सेवा आणि झालेला अपघात याचा सारासार विचार करून कडक नियमावलींसह नोव्हेंबर २०२१ मध्ये निविदा काढली होती.
या निविदा प्रक्रियेत तीन संस्थांनी सहभाग नोंदविला. त्यात युनिटी या कंपनीला बोटिंगचा मक्ता देण्यात आला आहे. मक्ता निश्चित करून सहा महिने लोटले. दरम्यान, पावसाळा व इतर तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी बोटिंग सुविधा वेटिंगवर होती. अखेर याला मुहूर्त लागला असून चार प्रकारच्या आठ बोटी दाखल झाल्या आहेत. आता रायडर्सची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी, पाणी पातळीची चाचणी, जलपर्णी काढणे, तिकीट बुकिंग कक्ष, बोटी ठेवण्यासाठी फ्लोटिंग जेटची उभारणी आदी बाबींची पूर्तता करण्यात येत आहे.