उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’
नवरात्रोत्सवानिमित्त महिलासांठी अभियान
पंढरपूर (दि.17):- नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविले जात असून, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या वतीने अभियान सुरु करण्यात आले असून या अंतर्गत गरोदर माता व 18 वर्षावरील महिलांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार असून, जास्ती-जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेशकुमार माने यांनी केले आहे.
सदर अभियान उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. हे अभियान 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या नवरात्रोत्सव कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत तज्ञांमार्फत तपासणी, समुपदेशन व औषधोपचार मोफत करण्यात येणार असून, तालुक्यातील तसेच परिसरातील 18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असून, विविध उपक्रमांच्या माध्यमांतून हे अभियान राबविण्यात येत असल्याचे डॉ.माने यांनी सांगितले.
लवकर लग्न केल्यामुळे मातेला होणारे तोटे आणि योग्य वयात लग्न केल्यामुळे मातेला होणारे फायदे या विषयावर उपजिल्हा रुग्णालयातील श्रीमती शिंदे, हेबांडे, कुलकर्णी, रावळे, जगताप, गडमवाड यांनी लघुनाटीका सादर केली. तर मुलीचे स्वागत का व कसे करावे यावर श्रीमती नाडगौडा व कर्चे यांनी कविता सादर केली. या श्रीमती कदम यांनी सरस्वती होऊन हातात आरोग्याबाबत बॅनर घेऊन गरोदर मातांना उपदेशात्मक संदेश दिला.
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाचे दुस-या दिवसाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले व चेअरमन भैरवनाथ शुगरचे संचालक अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. स्वाती बोधले, डॉ.आशा घोडके, डॉ.पाटील, डॉ.भतलवंडे, डॉ. केचे, डॉ. गायकवाड तसेच महाविर देशमुख विश्वजित भोसले , शिवाजी बाबर, श्री. सुमित शिंदे , शाम गोगाव यांचा उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व परिचारिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरषोत्त्तम कदम यांनी केले.