कर्मवीरांचा वारसा विद्यार्थ्यांनी पुढे चालवावा – इंद्रजित देशमुख
पंढरपूर – “सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा आणि सौदर्य याच्यासाठी जगणारी माणसे ही संकुचित व मेलेली असतात. तर लाखो लोकांचे अश्रू पुसणारे व त्यांच्या आयुष्याला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी जगलेले कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने अजरामर ठरले. सध्याच्या युगातील विद्यार्थ्यांनी फॅशन आणि व्यसन यामध्ये न अडकता वैज्ञानिक आणि संविधानिक शिक्षणासोबतच जीवनमूल्ये अंगीकारणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व युवा प्रबोधनकार इंद्रजित देशमुख यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, माजी कुलसचिव एस.एच.पवार, जनरल बॉडी सदस्य नानासाहेब लिगाडे, सुभाष सोनवणे, डॉ. राजेंद्र जाधव, अमरजित पाटील, वसंतराव देशमुख, डॉ. दादासाहेब साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
इंद्रजीत देशमुख पुढे म्हणाले की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोर, गरीब, उपेक्षित, वंचित, श्रमिकांच्या मुलांना सर्वांगीण शिक्षण देवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न पहिले. शिक्षणातून घडणारी पिढी ही चारित्र्यसंपन्न व सुसंस्कारित घडावी. शिक्षणातून मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवून उंच इमारती उभारण्यापेक्षा समाजाच्या नैतिकतेची उंची त्यांनी वाढविली पाहिजे. शिक्षणातून आत्मविश्वास, सहजीवन, द्वेषमुक्त समाज घडविला पाहिजे. यासाठी रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली. त्यातून लाखोंचे जीवन फुलत गेले. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने भगीरथ ठरतात.”
अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ध्येय निश्चिती केली पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणासाठी केलेले श्रम आणि त्याग लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि उर्जा मिळेल.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. रमेश शिंदे यांनी करून दिला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील पीएच. डी. पदवी संपादन केलेल्या व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आर्थिक जगत, अर्थ मंच, युरेका आदी भित्तीपत्रकांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर, व्होकेशनल, बी.सी.ए., बी.सी.एस., यशवंत विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, कनिष्ठ उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे, समारंभ समिती प्रमुख डॉ. दत्ता डांगे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, शिवाजी लोभे, अभिजित जाधव आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत नलवडे, डॉ. अमर कांबळे व प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सौ. अनिता साळवे यांनी मानले.