स्वेरी फार्मसीमध्ये जी-पॅट उत्तीर्ण विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्यूकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्मसी) महाविद्यालयातील तब्बल १३ विद्यार्थ्यांना ‘जी-पॅट २०२२’ या राष्ट्रीय पातळीवर परीक्षेत उज्ज्वल यश मिळाले. मोहिनी जमदाडे, आकांक्षा शिंदे, प्राजक्ता साळुंखे, पूजा लोखंडे, स्मिता लोंढे, पल्लवी हाके, रोहिणी ओव्हाळ, प्रतीक जाधव, प्रमोद बिराजदार, अजित खिलारे, प्राजक्ता जानकर, शुभम काळे व संकेत रेपाळ या यशस्वी विद्यार्थांचे कौतुक करण्यासाठी स्वेरी फार्मसीमध्ये पाल्य व पालकांचा गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी स्वेरी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, संस्थेचे जेष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे तसेच प्रमुख अतिथी म्हणून टी.सी.एस.मध्ये कार्यरत असणारे स्वेरी फार्मसी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरज देशमाने हे उपस्थित होते. सुरुवातीला स्वेरी फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी प्रास्ताविकामध्ये कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु असताना देखील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे नमूद करून या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच जी-पॅट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या स्वेरीतील विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत राहील, अशी आशा देखील व्यक्त केली. जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी देखील विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून ‘परिश्रमात जर सातत्य असेल तर अवघडातील अवघड परीक्षेत देखील आपण सहज यश मिळवू शकतो.’ असे प्रतिपादन केले. माजी विद्यार्थी व टी.सी.एस. मध्ये सध्या कार्यरत असलेले सुरज देशमाने यांनी विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्रातील पदवीनंतर उपलब्ध असणाऱ्या देशांतर्गत व विदेशातील विविध करिअरच्या संधी विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच औषधनिर्मात्याच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले.या प्रसंगी जी-पॅट उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मिळालेल्या यशात स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न ऑफ प्रोफेशनल एज्यूकेशन (ट्रिपल पीई)’ व ‘आदरयुक्त शिस्तीचा’ यशात खुप मोठा वाटा आहे.’ असे सांगितले. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ बी. पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, बी. फार्मसी चे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली व उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने विद्यार्थांनी परिश्रम घेतले आणि या यशाला गवसणी घातली. त्याबद्दल त्यांचे व कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे यावेळी सत्कार करण्यात आले. या सत्कार सोहळ्याचे समन्वयक म्हणून प्रा.वैभव गायकवाड यांनी कामकाज पाहिले. सुप्रिया खेडकर आणि स्नेहल आलदर यांनी सूत्रसंचालन केले तर किरण पिटले यांनी आभार मानले.