स्वेरी आणि एमजीएम हेल्थ सायन्सेस यांच्यामध्ये सामंजस्य करार
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, मुंबई यांच्या अंतर्गत असणाऱ्या एमजीएम स्कूल ऑफ फिजीओथेरपी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या अनुषंगाने शिक्षण आणि संशोधनातील विविध स्तरावर परस्पर समन्वयातून काम करण्यात येणार आहे. या करारामुळे संशोधकांना सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात विविध स्तरावर आवश्यक असणारी उत्पादने विकसित करणे, त्या वस्तू/उत्पादनांचे डिझाईन तयार करणे यासाठी मदत होणार आहे.
या करारामुळे मेडिकल क्षेत्रातील विविध उपकरणांचे डिझाईन करण्यासाठी आणि ती उपकरणे अधिक विकसित करण्यासाठी मदत होणार आहे. दोन्ही संस्थांमधील शिक्षक आणि विद्यार्थी परस्पर संवाद व सल्ला-मसलत करू शकणार आहेत. पदवी व पदव्युत्तर वर्गांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांसाठी देखील मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना इंटर-डीसीप्लीनरी रिसर्च करण्यासाठी देखील या कराराच्या माध्यमातून संधी प्राप्त होणार आहे. या कराराद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक यांना जॉईंट कोर्सेस, इतर शैक्षणिक आणि संशोधन संबंधित कामे करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या करारावर एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, कामोठे मुंबईचे रजिस्ट्रार डॉ. राजेश गोयल व एमजीएम स्कूल ऑफ फिजीओथेरपीच्या संचालक डॉ. रजनी मुलेरपठाण, एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, मुंबईच्या रिसर्च डायरेक्टर डॉ. सविता राम तसेच स्वेरी तर्फे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संशोधन अधिष्ठाता डॉ. आर.आर.गिड्डे आणि ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा करार यशस्वी करण्यासाठी डॉ. बेला अग्रवाल आणि डॉ. त्रिवेणी शेट्टी यांनी देखील परिश्रम घेतले. स्वेरीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांसोबत सुमारे ४७ सामंजस्य करार करण्यात आले असून त्यांद्वारे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या बौद्धिक विकासास आणि तांत्रिकi कौशल्य वाढीस चालना मिळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळविला जाईल हे पाहून त्या दृष्टीने संस्थेने विविध पाऊले उचलली आहेत. आता स्वेरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल, यावर भर देत आहे. याच कारणामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व परराज्यातील विद्यार्थी देखील स्वेरीकडे शिक्षणासाठी वळत आहेत. भारत सरकारच्या भाभा अणूसंशोधन केंद्रासह इतर अनेक संस्थाबरोबर झालेल्या करारामुळे आजमितीस संशोधनासाठी रु. नऊ कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला आहे. स्वेरीचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट आणि विद्यापीठात सर्वोच्च निकाल मिळविण्याबरोबरच संशोधनाकडे देखील वळत आहेत, ही सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालादेखील गौरवाची बाब आहे. हा करार पूर्ण होण्यासाठी स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन अधिष्ठाता डॉ. आर.आर. गिड्डे यांनी परिश्रम घेतले. हा करार यशस्वीपणे पार पडल्याने संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इनचार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.