स्वेरीच्या माजी विद्यार्थिनींनी दिले ‘करिअर मंत्र’
स्पर्धा परीक्षा आणि उद्योग यावर केले बहुमोल मार्गदर्शन
पंढरपूर- स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागांमधील मुलींसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मार्फत शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थिनी राधिका दादासाहेब हावळ यांनी सिव्हिल अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनींना सिव्हिल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या सरकारी नोकरीच्या संधी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यासाठी लागणारे स्टडी मटेरियलची कसे मिळवायचे ? कोणकोणत्या परीक्षा द्यायच्या ? या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. राधिका हया २०१२ बॅचच्या विद्यार्थिनी आहेत. लान्स ग्लोबलायझेशन पुणे मध्ये टीम लीडर म्हणून नोकरी करत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या माजी विद्यार्थिनी बानु दत्तात्रय चव्हाण यांनी मुलींसाठी विविध कंपन्यांमध्ये असलेल्या संधी आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी यासंदर्भात मार्गदर्शन केले. बानू चव्हाण यांना बेस्ट आऊटगोइंग स्टुडंट पुरस्कार देखील मिळाला होता. बानू हया २०१७ बॅचच्या विद्यार्थिनी आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या माजी विद्यार्थिनी कोमल चंद्रकांत काटे या सध्या जर्मनी येथील हाऊस स्कूल ऑफ युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सायन्स करत आहेत. कोमल यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींना उत्तीर्ण झाल्यानंतर विविध कंपन्यांमध्ये आणि त्याच बरोबर इतर देशांमध्ये असलेल्या उच्च शिक्षणाच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली. याचबरोबर त्यांनी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी असलेल्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील विविध परीक्षा याबद्दल सखोल माहिती सांगितली. स्वेरी अभियांत्रिकीची माजी विद्यार्थी संघटना नेहमीच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या संधी आणि त्यासाठी लागणारी तयारी याची संपूर्ण आणि सखोल माहिती देण्यासाठी त्या क्षेत्रात काम करत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि विविध चर्चांच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन करत असते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागातील प्राध्यापक, स्वेरीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. अविनाश मोटे व विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.