स्वेरी अभियांत्रिकीच्या श्रम संस्कार शिबीराचे तावशीत उदघाटन

0

राष्ट्राच्या उभारणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे - सचिव बाळासाहेब यादव

स्वेरी अभियांत्रिकीच्या श्रम संस्कार शिबीराचे तावशीत उदघाटन 

पंढरपूर – ‘संपूर्ण जगामध्ये एकमेव तरुण देश म्हणून ज्या देशाकडे पाहिले जाते तो आपला भारत देश आहे. आज भारतामध्ये युवकांची संख्या ही सर्वात जास्त आहे आणि ह्या युवकांच्या शक्तीमुळेच आज देश घडत आहे. राष्ट्राच्या उभारणीत युवकांचे खूप मोठे योगदान आहे. राष्ट्र उभारणी साठी आवश्यक असणाऱ्या संस्कारांची सुरुवात ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशे मध्ये असताना घडत असते. तावशी या गावाला संपूर्ण देश पातळीवर वेगवेगळे पुरस्कार मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे या गावात असलेली एकी, गावातील साक्षरता आणि गावच्या विकासामध्ये युवकांचे असलेले योगदान! या सर्व बाबींमुळेच संपूर्ण देशपातळीवर या गावाचं नाव उज्वल झाले आहे. त्यामुळे या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संस्काराचे धडे या ठिकाणी घेऊन आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग हा आपल्या गावाच्या विकासासाठी करावा. एकूणच राष्ट्राच्या उभारणीत युवकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.’ असे प्रतिपादन जय मल्हार शिक्षण मंडळाचे सचिव बाळासाहेब (काका) यादव यांनी केले. 



                 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त  विद्यमाने तावशी (ता. पंढरपुर) मध्ये दि.१४ मार्च २०२२ ते २० मार्च २०२२ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष परिश्रम व संस्कारात्मक स्वरुपाच्या शिबिराचे आयोजन केले असून त्याच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब यादव हे मार्गदर्शन करत होते. तावशीचे उपसरपंच अमोल कुंभार यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. प्रास्तविकात स्वेरीज् इंजिनिअरींगच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे  कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती यांनी या तब्बल आठवडाभर चालणाऱ्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’ची सविस्तर माहिती दिली. या शिबिरात दररोज सकाळी ९ पासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार असून त्यात योगासने, सूर्यनमस्कार, श्रमदान, चर्चासत्र व जनजागृती, प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच आरोग्य, आजार, स्वच्छता यावर मार्गदर्शन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, ग्राम स्वच्छतेचे महत्व, मुली वाचवा, देश वाचवा, प्लास्टिकबंदी, जनजागृती, पाणी व्यवस्थापन, शैक्षणिक प्रबोधन, शिक्षणाची गरज व महत्व, लहान मुलांचे हक्क व सुरक्षितता व  शैक्षणिक कार्या संबंधित विविध विषयांवर प्रबोधनपर व ग्रामस्वच्छता विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज यांच्या सहकार्याने तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश  मठपती व प्रा. सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली व प्रा. करण पाटील, अभियांत्रिकीतील रासेयोचे  सत्तरहून अधिक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमासाठी तावशी ग्रामस्थ  देखील सहकार्य करत आहेत. यावेळी तावशीचे सरपंच गणपत यादव, जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल शिखरे, जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष यादव, मार्केट कमिटीचे संचालक धनाजी यादव, माजी उपसरपंच संजय  यादव, पांडुरंग आसबे, सदस्य विठ्ठल पिसे,  स्वेरीचे रासेयो चे सल्लागार डॉ. आर.एन. हरिदास, प्रा. एस. आर. गवळी,  प्रा. के. एस. पुकाळे, प्रा. ए. एम. कस्तुरे, प्रा. टी.एस जोशी, प्रा. ए.एस. जाधव, प्रा. जी.जी. फलमारी, प्रा. एस.बी. खडके, प्रा. टी.डी. गोडसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !