‘पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावली पाहिजेत’
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन
स्वेरीत वक्तृत्व आणि पथनाट्य स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पंढरपूर – ‘आज मानवाच्या हस्तक्षेपातून पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. मनुष्य प्राण्यांवर आणि पिकांवर या असमतोलाचा फार वाईट परिणाम होत आहे. अवेळी पडणारा पाऊस, अनपेक्षित उद्भवणारे आजार, पिकांवरील कीड हे या असमतोलाचेच परिणाम आहेत. ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज यांनी ‘पर्यावरणाबाबत जागृती’ करण्याचे मोठे कार्य हाती घेतले आहे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन या बाबतीत विविध महाविद्यालयातील युवा वर्गाचा सहभाग वाढवून त्यांच्या मध्ये जागृती निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. आपल्या संतांनी वृक्ष लागवडीचे सांगितलेले महत्व लक्षात घेऊन आपण आपल्या पुढील पिढीसाठी चांगला निसर्ग देणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावलीच पाहिजेत.’ असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या भव्य आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर, सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, आर्ट ऑफ लिव्हिंग, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे, देवराई फौंडेशन तळेगाव, आपलं पर्यावरण, नाशिक, संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण युवा जागृती’ या विषयावर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व आणि पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा उपक्रम ‘हरित पालखी महामार्ग अभियान’ अंतर्गत करण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, श्रीक्षेत्र पंढरपूर चे सदस्य ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज यांनी प्रास्तविकात या स्पर्धेच्या आयोजनामागचा हेतू, वृक्ष लागवड व संगोपनाचे महत्व याबाबत सविस्तर सांगितले. संस्थेचे मार्गदर्शक व माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी याप्रसंगी बोलत असताना, 'वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही आपल्या पिढीची कर्तव्ये असून जर ही कर्तव्ये पार पाडली नाहीत तर येणाऱ्या पिढीला आपण प्रदूषित पर्यावरण बहाल करणार आहोत. ही बाब सर्वथा अयोग्य आहे. शुद्ध पर्यावरणात श्वास घ्यायचा असेल तर वृक्षारोपण करण्याशिवाय पर्याय नाही. पथनाट्य, वक्तृत्व अशा कलांचा आधार घेऊन समाजामध्ये वृक्ष संवर्धन प्रति प्रबोधन करणे गरजेचे आहे' असे सांगितले.
यावेळी वक्तृत्व स्पर्धा व पथनाट्य स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. वक्तृत्व स्पर्धेचा प्रथम पुरस्कार गजानन शिरीष दहिहंडे (शिवाजी महाविद्यालय, बार्शी) यांना रु. ५००० रोख बक्षिसासह देण्यात आला तर द्वितीय पुरस्कार विभागून सेजल कवठेकर (सांगोला महाविद्यालय) व मोनाली पाटील (श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा) यांना देण्यात आला. तृतीय पुरस्कार मयुरी वाघमारे (पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांना देण्यात आला तर उत्तेजनार्थ चतुर्थ पुरस्कार नागनाथ साळवे (शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज) यांना देण्यात आला. पथनाट्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, द्वितीय पुरस्कार शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, तृतीय पुरस्कार सांगोला महाविद्यालय सांगोला तर विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय, टेंभूर्णीला उत्तेजनार्थ बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज, प्रांताधिकारी गजानन गुरव, उद्योजक अरुण पवार, सौ. नडगीरे, सौ.निगडे, जि. प. सदस्य बाळासाहेब देशमुख, प्रा. नलावडे, डॉ. विश्वनाथ आवड, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे हे उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सौ.निगडे मॅडम यांनी मानले.