स्वेरी अभियांत्रिकीचा ‘गेट ट्यूटर इन्फो एज’ सोबत सामंजस्य करार
पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचा ‘गेट ट्यूटर इन्फो एज’ सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
‘ग्रॅज्यूएट अॅप्टीट्युड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ अर्थात ‘गेट’ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आय. आय. टी. , एन.आय.टी., आणि इतर मानांकित संस्थेमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या अर्थात पी.एस.यू. च्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतात. यापूर्वी देखील स्वेरीच्या अनेक विद्यार्थ्यांना ‘गेट’ या परीक्षेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या नोकरींच्या संधी मिळालेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षेची तयारी इंजिनिअरींग करत असतानाच करता यावी यासाठी ‘ऍडव्हान्स्ड टेक्निकल ट्रेनिंग’ च्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या करारामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने अधिक तयारी करता यावी यासाठी ‘गेट ट्यूटर’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग करता येणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थी 'गेट' परीक्षेसाठी पूरक असणारे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवू शकतात आणि त्याचबरोबर इतर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासोबत आपल्या शंका दूर करण्यासाठी चर्चा देखील करू शकतात. ‘गेट ट्यूटर’ च्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या सर्व शाखेच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना ‘गेट’ साठी तयारी करण्यासाठी मदत होणार आहे. ‘गेट ट्यूटर’ या प्लॅटफॉर्मवर या परीक्षेसाठी असणाऱ्या सर्व विषयांचे प्रश्न व उत्तरे आणि त्याबद्दलचे संपूर्ण मार्गदर्शन यांचा समावेश आहे. विद्यार्थी या प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने विविध विषयांच्या टेस्ट सोडवू शकतात आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ‘डिस्कशन फोरम’ मुळे विद्यार्थी त्यांच्या अडचणींबाबत इतर विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करू शकतात. ‘गेट’ बरोबरच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठीही या प्लॅटफॉर्मचा उपयोग करता येणार आहे. मागील पाच वर्षात जवळपास ५५ पेक्षा अधिक विद्यार्थी चांगल्या रँक ने ही परीक्षा उत्तीर्ण होऊन यशस्वीपणे करीअर करत आहेत. आता झालेल्या या करारामुळे या संख्येत नक्कीच मोठी वाढ होणार आहे.
हा सामंजस्य करार ‘गेट ट्यूटर’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन बोरीगिड्डे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे आणि ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा हा करार करण्यात आल्याने संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इनचार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.