उत्तम व्यवसायासाठी समाजातील सर्व घटकांशी संवाद अत्यंत महत्वाचा - डिझाईन स्टुडीओच्या डॉली पारीख
स्वेरीत ‘डिझाईन थिंकिंग अँड इंटरप्रेन्यूअल पेडागॉगी’ या कार्यशाळेचा समारोप
पंढरपूर- ‘ज्यावेळी आपण उद्योग धंद्यात पडतो त्यावेळी आपण समोरच्या व्यक्तींच्या ठिकाणी आहोत अशी कल्पना केल्यास आणि त्याप्रमाणे व्यवहार केल्यास यातून आपले ज्ञान वाढते. यामुळे भविष्यकाळात आपला उद्योग वाढीस लागतो. त्यासाठी युवकांनी शिक्षण संपल्यानंतर नोकरीच्या शोधार्थ वेळ न घालवता छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायात गुंतवणूक केली तर त्याचा परतावा झपाट्याने मिळतो. उद्योगात गुंतवणूक करून उद्योग वाढीसाठी चिकाटी बरोबरच प्रयत्न आणि परिश्रम केल्यास कोणत्याही परिस्थितीत आपल्या व्यवसायात वृद्धी होते. यासाठी ग्राहकाबरोबर उत्तम संवाद असायलाच हवा. यासाठी उद्योगाची पार्श्भूमी जाणून घेणे महत्वाचे असते. आपल्या मालाचे महत्व आणि खप या गोष्टी आपल्या ज्ञानावर अवलंबून असतात. यासाठी अनुभव महत्वाचा आहे. यासाठी अनेकांनी मिळून कोणता उद्योग चांगला, त्याची व्याप्ती किती, खप, मागणी या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी आणि व्यवहार ज्ञान येण्यासाठी समाजातील सर्व घटकांशी संवाद साधणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन सिलिकॉन व्हॅली येथील डिझाईन स्टुडीओ अँड पार्टनरच्या डॉली पारीख यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली ‘डिझाईन थिंकिंग अँड इंटरप्रेन्यूअल पेडागॉगी’ या विषयावर आयोजिलेल्या एक आठवडा भर चाललेल्या कार्यशाळेचा आज समारोप करण्यात आला. याप्रसंगी डॉली पारीख मार्गदर्शन करत होत्या. कोरोना प्रकोपानंतर प्रथमच स्वेरीतील वातानुकुलीत असलेला आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पूर्णपणे भरलेला होता. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी आठवडा भर चाललेल्या या कार्यशाळेचा सार सांगून सोबस च्या कार्यावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना डॉली पारीख म्हणाल्या की, ‘व्यवसाय उद्योगांमध्ये आपल्याला विकास साध्य करायचा झाल्यास त्याचा अभ्यास, मार्केटमधील चढ-उतार, वाहतूक व्यवस्था, बाजारभाव व मार्केटमधील चढ-उतार या बाबींकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. या वेळी विद्यार्थ्यांसाठी 'ग्रुप डिस्कशन' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहा विद्यार्थ्यांच्या मध्ये एक प्राध्यापक नेतृत्व करायचे यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास आणि प्रगल्भता लक्षात येत होती. त्यांच्या विचारातून नवनवीन संकल्पना आणि व्यवहार वृत्ती दिसून येत होती. यानंतर गणेश घाडगे, दिपाली पोतदार, समीर बेऊर, नागेश बिराजदार, रमेश पाटील, केदार कारभारी, विशाल माळवदकर यांच्याबरोबर अनेक विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन डॉली पारेख यांनी केले. या कार्यशाळेसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या सात दिवसात विविध महाविद्यालयांतून आलेल्या विद्यार्थांनी संशोधन विभागातील नवनवीन संशोधनाची प्रत्यक्ष भेट घेवून माहिती जाणून घेतली. आठवडाभर चाललेल्या या कार्यशाळेसाठी आलेले पाहुणे व विद्यार्थी यांच्या भोजनाची व राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक वर्ग अहोरात्र परिश्रम घेत होते. यावेळी केएलई सेंटर ऑफ टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन अँड इंटरप्रेनरशिप (सी.टी.आय.ई.) चे माजी संचालक डॉ. नितीन कुलकर्णी, ‘सोबस इन्साईटस् फोरम’चे व्यवस्थापकीय संचालक दिग्विजय चौधरी, वर्क वाईजचे इंटरप्रेनर कोच आणि संस्थापक दिपक मेनन, सोबसच्या संचालक रेषा पटेल, गिरीष संपत, आकांक्षा सिन्हा, ईशान पंत तसेच स्वेरीतील संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.