पंढरपूर: ‘विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रातील कंपनीत रुजू होताना ज्या मुलाखतीला सामोरे जावे लागते, त्यावेळी विचारलेल्या सर्व पश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने व विचारपूर्वक द्यावीत. त्यामुळे मुलाखत घेणारा अधिक प्रभावित होतो आणि विद्यार्थ्यांचे सकारात्मक मूल्यमापन होऊन निवड होण्यास खूप मदत होते. विद्यार्थ्यांनी ज्या विषयाची अधिक माहिती आहे त्या विषयीच उत्तरे द्यावीत. मुलाखत देताना अनावश्यक बोलणे गरजेचे नसते. मुलाखतीच्या सहाय्याने आपल्याला नोकरीची संधी निर्माण होत असते. पण जेंव्हा संधी मिळत नाही अशा वेळी आणखी आत्मविश्वासाने पुढील कंपनीमध्ये संधी शोधावी. नोकरी देणारा व नोकरी घेणारा यांची गरज एकच झाल्यानंतर नोकरी करण्याची संधी मिळते.’ असे प्रतिपादन टेंभुर्णी (ता. माढा) येथील जिंदाल फिटिंग कंपनीतील कॉलिटी विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक पारसकुमार जैन यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरींग कॉलेजच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उत्तीर्ण झाल्यानंतर कंपनीत रुजू होताना नेमके कोणते गुण पाहिले जातात यावर एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. त्यात जिंदाल फिटिंग कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक जैन हे ‘कॉलिटीज इन फ्रेशर्स फॉर एनी इंडस्ट्री’ या विषयावर मार्गदर्शन करत होते. प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी व्यवस्थापक जैन यांचे स्वागत केले तर प्रास्ताविकात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. श्रीधर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना करिअर करताना मोठमोठ्या कंपन्यात संधी मिळविण्यासाठी कोणकोणते गुण असावेत याबाबत मार्गदर्शन केले. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये जाण्यासाठी मुलाखत कशी द्यावी, विद्यार्थ्यांनी मुलाखत देताना नेमकी कोणती तयारी करावी, कोणत्या बाबी महत्वाच्या असतात, विद्यार्थ्यांना भविष्यात त्याचा काय फायदा होतो, या व अशा विविध बाबींवर महत्वाची माहिती देताना जैन म्हणाले की, ‘नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'मुलाखत' असते. आपले शिक्षण कितीही उत्कृष्ट असले तरी मुलाखतकार नेहमी तुम्ही त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी खरोखर इच्छुक आहात का? याची मुख्यत्वेकरून चाचपणी करत असतात. त्यामुळे तुम्ही ज्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला आहे त्या कंपनीच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती प्रथम अवगत करा. संबंधित कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. कंपनीचा इतिहास, प्रोजेट्स आणि कंपनीला मिळालेले पुरस्कार आदी बाबींची माहिती करून घेतल्यास मुलाखतकार अधिक प्रभावित होतो आणि आपल्याला संधी मिळते. यावेळी विद्यार्थ्यांनी मुलाखत यशस्वी पणे देण्याबाबत अनेक प्रश्न विचारले यावर त्यांनी योग्य आणि समाधानकारक उत्तरे दिली. सूत्रसंचालन प्रा. अजिंक्य देशमुख यांनी केले तर प्रा.आकाश पवार यांनी आभार मानले.
👏👏👏👏💞⚘⚘⚘
ReplyDelete