विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे १२ नंतरची शैक्षणिक वाटचाल असते. यामध्ये १२ सायन्स उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, उत्कृष्ट प्लेसमेंट, उत्कृष्ट निकाल अशा महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होते. यादरम्यान प्रचंड मानसिक ताणतणाव निर्माण होऊन वेळ, पैसा वाया जातो म्हणून पालक व विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी महाविद्यालय निवडतानाच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
*१. महाविद्यालयाची पार्श्वभूमी:* २१ व्या शतकात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यामध्ये शिक्षणाची गुणवत्ता, सकारात्मक दृष्टिकोन याशिवाय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतुन झालेला विकास, प्लेसमेंट मधुन कॉलेजची पार्श्वभूमी, मानांकन लक्षात घेऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे याशिवाय कॉलेजची शैक्षणिक संस्कृती बघणे आवश्यक.
*२. प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारी:* महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग हा त्या कॉलेजचा आरसा असतो. शिस्तप्रिय व नम्रपणे वागणारे कर्मचारी वर्ग, उच्चविद्याभूषित म्हणजे पीएचडी धारक असलेले प्राध्यापक व त्यांची संख्या याचा विद्यार्थी जीवनावर योग्य तो परिणाम होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
*३. विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था:* महाविद्यालय ज्या शैक्षणिक संस्थेकडून चालवले जाते त्या संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान याशिवाय संस्थेचा शैक्षणिक क्षेत्रातील विकास, भविष्यातील दृष्टीकोन, संशोधन, उद्योजक यासर्व दृष्टीने सुरु असणारी वाटचाल, प्लेसमेंट्स या दृष्टीने सर्वोत्तम प्रगतीपथावर असलेले महाविद्यालय विद्यार्थ्यांनी निवडावे.
*४. प्रकल्पाधारीत शिक्षण पद्धती:* अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचे अंगभूत कौशल्य ओळखुन प्रकल्पाधारीत शिक्षण राबवत असलेले तसेच प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देत असलेले महाविद्यालय पहावे. प्रकल्पाधारीत शिक्षण खरच महाविद्यालयात राबवले जाते का? हे पाहणे आवश्यक आहे. प्रकल्पामधून विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडित अनेक संकल्पना स्पष्ट होत असतात. त्यामधून त्यांची संशोधन वृत्तीला चालना देणारे महाविद्यालय.
*५. चौकटीच्या बाहेर नेणारी व आधुनिक विचारसरणी:* वर्तमानात जागतिक पुढारलेपण मिळाले असले तरी पाश्चात्य विचार, आदर्श व जीवन पद्धत उर्वरित जगासाठी अनुकरणीय असलेले महाविद्यालय. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी गतिमान आणि सर्वस्पर्शी विकास सातत्याने चालू असलेले महाविद्यालय पहावे.
*६. कॅम्पस प्लेसमेंट:* अभियांत्रिकी शिक्षणातील महत्वाचे असते ते कॅम्पस प्लेसमेंट. यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणारी प्रशिक्षण व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे का? महाविद्यालयात येणाऱ्या कंपन्या ह्या नामांकित आहेत का? हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.
*७. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व्यवस्था:* महाविद्यालयातील शिस्तबद्धता आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी तसेच विचाराने सक्षम व परिपक्व होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आयोजित करत असलेले महाविद्यालय.
*८. व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम:* शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक असुन महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास होणेसाठी विविध उपक्रम राबवत असलेले महाविद्यालय.
*९. कॉलेजची फी:* प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयाची फी महत्त्वपूर्ण भाग आहे. हि फी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली असणा-या समिती जी शासनाने गठीत केली असते. आधुनिक पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या पगारावर होणारा खर्च, या सर्व बाबींचा विचार करून फी ठरवली जाते. जर एखादे महाविद्यालय फी कमी घेत असेल तर, त्याचा थेट परिणाम शिक्षकांच्या पगारावर व सोयीसुविधा यावर होतो. त्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी फक्त शैक्षणिक फी कमी होते म्हणून अभियांत्रिकीचा प्रवेश घेऊ नये. ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
*१०. पारदर्शक प्रवेश प्रक्रिया-पदध्ती:* अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती नसते. यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया कालावधीत स्वतःचा युझर आयडी व पासवर्ड शिक्षकांना/इतरांना देतात त्यामुळे विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यापासून वंचित राहू शकतो. यासाठी विद्यार्थी व पालकांनी युझर आयडी व पासवर्ड कुणास न देणे योग्य आहे.
*११. महाविद्यालयाचा विद्यापीठ प्रशासनातील सहभाग:* महाविद्यालय हि विद्यापीठाशी संलग्न असतात व विद्यापीठ प्रशासन हे अभ्यासक्रमातील विषयांची निवड, अभ्यासक्रम ठरवणे, अभ्यासक्रमाचा आराखडा ठरवणे व शैक्षणिक विषयक इतर बाबी ठरवणे या साठी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांची मदत घेत असते अशा विविध जबाबदाऱ्या घेणारे प्राध्यापक हे अनुभवी असतात त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना होतो त्यामुळे असे प्राध्यापक महाविद्यालयात असणे हि बाब चांगली असते.
*१२. महाविद्यालयाचे विविध क्षेत्राशी असणारे संबंध:*
महाविद्यालयाचे विविध क्षेत्राशी असणारे संबंध व सामंजस्य करार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असणाऱ्या संधी उपलब्ध करून देत असतात व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी कार्यक्षेत्राशी निगडित विविध संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते त्यामुळे पर्यायाने विद्यार्थी दशेतच अभियांत्रिकी क्षेत्रातून जागतिक स्तरावर असणाऱ्या संधी व कार्यक्षेत्र ठरवण्यास मदत होते.
वरील बाबीचा विचार करूनच अभियांत्रिकीचा प्रवेश निश्चित करत असताना विद्यार्थी व पालकांनी स्वतःच महाविद्यालयात जाऊन सर्व गोष्टींची सत्यता पडताळून शांत विचार करून, कोणत्याही आमिशाला, दबावाला बळी न पडता विद्यार्थ्यांनी उत्तम करिअरसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय निवडावे.