उजनी धरणावर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबत उठवला आवाज आमदार अभिजीत पाटील.
सीना-माढा उपसा सिंचनावर तुळशी, बावीसह अनेक गावाचा पाण्याचा गंभीर प्रश्नाचा आवाज पोहचविला विधानभवनात
प्रतिनीधी/-
माढा विधानसभा मतदारसंघाचे नुतन आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मागील दोन दिवसापासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा माढा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम आमदार अभिजीत पाटील यांचे कडून सुरू आहे. मतदार संघातील विविध विकासकामांची मुद्देसुर मांडणी करीत आमदार अभिजीत पाटील यांचेकडून विविध विकास कामांची मागणी केली जात आहे.
माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. अभिजीत पाटील यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही आपल्या मतदार संघांपैकी अनेक प्रलंबित आणि महत्वाच्या प्रश्नावर आवाज उठविला आहे. यामध्ये माढा शहरातील पाण्याची पाईपलाईन खराब असल्याने वर्षभरातील ३६५दिवसातील अवघ्या ३१दिवस पाणी पुरवठा केल्याचे निदर्शनास आणून देत. या पाईपलाईन दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
उजनी धरणापासून जवळ असलेल्या आलेगाव आणि सुस्ते गावाजवळ बंधारे बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री म्हणुन ना.चंद्रकांत पाटील यांनी २०१९ साली आश्वासन दिले होते. त्याचे पुढे काय झाले. याबाबतची आठवण करून देत याठिकाणी बंधारे बांधण्यात यावेत आशी मागणी आमदार अभिजीत पाटील यानी केली आहे.
याशिवाय उजनी धरणाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याची ही त्यांनी आग्रही मागणी करून पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारे हे धरण जर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झाले तर सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढून मोठ्या प्रमाणात अर्थकारणाला गती येईल ही बाब त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. विशेष म्हणजे या कामास मंजुरी मिळाली असून सदर काम त्वरित हाती घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय उजनी धरणामध्ये मत्स्यबीज सोडले जात नाही, त्यामुळे मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांची अडचण होते. यासाठी दरवर्षी पुरेशा प्रमाणात मत्स्यबीज उजनी धरणात सोडले जावे याचीही मागणी श्री. अभिजीत पाटील यांनी आज विधिमंडळामध्ये केली.
*तुळशीतील सामुदायिक विवाह सोहळ्याचे थेट अध्यक्षांनाच आमंत्रण*
माढा तालुक्यातील आलेगाव, सुस्ते येथील बंधाऱ्याची कामे त्वरित पूर्ण करण्याची ही मागणी त्यांनी केली. तालुक्यातील तुळशी, बावी, परिते, जाधवाडी, बैरागवाडी या गावांनाही उजनीचे पाणी अद्याप मिळाले नाही. तसेच तुळशी गावात पाण्याची सोय नाही म्हणून येथील तरुणांची लग्न जमत नाहीत, असे सभागृहाला सांगून अभिजीत पाटील यांनी जर तुळशी गावाला पाणी दिले तर या गावात सामुदायिक विवाह सोहळा घडवून आणून खुद्द विधानसभेच्या अध्यक्षांनाच त्यासाठी आमंत्रित केले जाईल अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली. शिवाय मानेगाव उपसा सिंचन योजनाही पूर्णत्वास न्यावी याची आग्रही मागणी अभिजीत पाटील यांनी यावेळी केली. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील शिवकालीन तलावात देखील उजनीचे पाणी सोडण्याची व्यवस्था व्हावी यासाठी त्यांनी मागणी केली.
सलग दुसऱ्या दिवशी प्रश्न मांडण्याची संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करताना आमदार पाटील यांनी प्रचारादरम्यान मतदारांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण मांडणी ते विधिमंडळात करत आहेत. नवख्या आमदाराकडून असे जनतेची निगडित असणारे प्रश्न मांडले जात असल्यामुळे माढा मतदारसंघातील जनतेकडून ही त्यांच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत होत आहे.