स्वेरीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

0
आपले संस्कार हीच आपली संपत्ती -कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

स्वेरीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
पंढरपूर- ‘मला कितीही त्रास झाला तरी चालेल पण माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही ही भावना जर आपल्या मनात असेल तर आपल्याला त्रास देण्याची भावना  कुणाच्याही मनात निर्माण होणार नाही. आपल्या कमतरता कोणत्या आहेत हे इतरांना माहिती असते परंतु आपण किती मजबूत आहोत हे पण दाखवून देणे गरजेचे आहे. लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेकडे पाहिले तर आज संशोधनातून शेतीविषयक तंत्रज्ञान निर्माण होणे गरजेचे आहे. जगात कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी आपण आपले संस्कार विसरु नयेत कारण ‘संस्कार हीच आपली खरी संपत्ती आहे आणि ही संपत्ती आपण टिकवली पाहिजे.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले. 
        गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५५ वी तर भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची १२० वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस.पी.कॉलेज, पुणेचे माजी प्राध्यापक विनय रमा रघुनाथ हे होते. महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत आणि स्वेरी गीतानंतर पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता म.गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी महात्मा गांधीजींच्या व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून ‘आपले ध्येय गाठत असताना आपल्या मर्यादा ओळखून आपण प्रयत्नशील असले पाहिजे' असे सांगून कर्ण आणि परशुराम यांच्या एकाग्रतेची कथा सांगितली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एस.पी.कॉलेज, पुणेचे माजी प्राध्यापक विनय रमा रघुनाथ म्हणाले की, ‘राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वावलंबी, सत्य व अहिंसा वृत्तीचे संपूर्ण जगाने स्वागत केले आहे. गांधीजींचे विचार हे समाज परिवर्तन करणारे होते. संपूर्ण जगाला प्रेरणा देणाऱ्या गांधीजींच्या विचारांची आज देशाला खरोखर गरज आहे. स्वाभिमानाने जीवन जगताना नोकरी मागणाऱ्या पेक्षा नोकरी देणारे व्हा. जोपर्यंत आपण मनमोकळे बोलत नाही तोपर्यंत समाज हा भयभीत राहतो त्यामुळे समाजाची अधोगती होत आहे. ’ असे सांगून महात्मा गांधी व अनेक थोर हुतात्म्यांची उदाहरणे दिली. पुढे बोलताना कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, ‘आपले जवान जेवढे सुरक्षित तेवढाच आपला शेतकरी सुरक्षित होवून उद्योगपती झाला पाहिजे, ही शास्त्रीजींची इच्छा होती. आपल्या मनात जेंव्हा शेतकरी होण्याची इच्छा येईल तेंव्हाच नवीन तंत्रज्ञान निर्माण होईल आणि शेतकरी हा टाटा, बिर्ला यांच्या पंक्तीत जाऊन बसेल. आज पाण्याची टंचाई भासत आहे त्यामुळे आपण रोपे लावावी व ती जोपासावी. याचे चांगले परिणाम येणार्‍या काळात आपल्याला नक्की जाणवतील म्हणून जीवनात ‘वृक्ष लागवड’ अत्यंत गरजेची आहे. जर सजीवांची काळजी घ्यायची असेल तर पाण्याची मात्रा वाढवली पाहिजे आणि पाणी वाढवण्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर भविष्यात ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतील. जर आपल्याला विकसित देश म्हणून पुढे जायचे असेल तर आपली उत्पादन क्षमता वाढविली पाहिजे.’ पुढे बोलताना त्यांनी शेती, माती आणि विद्यापीठाची नाती याबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. यावेळी गांधी जयंती निमित्त हॉस्टेल वरील क्लीन रूम स्पर्धा व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन विशेष सत्कार करण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते स्वेरीच्या प्राध्यापकांनी केलेले संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मिलाप असलेल्या ‘स्वेरीयन’ या  त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी. डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ. आर. एन. हरीदास, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी व पदविकेतील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन मानसी लोंढे, सृष्टी लामगुंडे व प्रथम वर्ष इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी महात्मा गांधीजींच्या संघर्षमय जीवनावर विशेष प्रकाश टाकून आभार मानले.


• या कार्यक्रमाच्या पूर्वी मतदार नोंदणीबाबत प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांंना संपूर्ण माहिती देण्यात आली. 
• प्रत्येकांनी आपला वाढदिवस आपल्या वयाच्या संख्येएवढी झाडे लावून साजरा करावा असे आवाहन कुलगुरू डॉ. महानवर यांनी केले. 
• विद्यापीठ परीसरात ५ लाख झाडे लावल्यानंतर स्वेरी सारख्या आदर्श संस्थेबरोबर एकत्र येऊन हे कार्य पुढे नेणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. 
• व्हाटस्अप वरील माहिती खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका, असे आवाहन प्रा. विनय रमा रघुनाथ यांनी सांगितले. 
• वाढती महागाई पाहून आणखी एकदा मिठाचा सत्याग्रह करण्याची गरज असल्याचे प्रा. विनय रमा रघुनाथ यांनी सांगितले. 
• प्रा. विनय रमा रघुनाथ यांनी आडनाव काढून आई वडिलांचे नाव लावून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !