दर्शनासाठी शुल्क घेणा-या व्यक्तीवर गुन्हा दाखल,
संबंधित व्यक्तीला विना परवाना दर्शनास प्रवेश देणा-या रक्षक सिक्युरिटी कंपनीच्या कर्मचा-यांची सेवा समाप्ती व कंपनीला कारणे दाखवा नोटीस, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके.
पंढरपूर (ता.19) – दिनांक 18 ऑगस्ट रोजी चेतन रविकांत काबाडे राहणार ठाणे हे भाविक श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनास आल्यानंतर सुमित संभाजी शिंदे या व्यक्तीने संबंधित भाविकांकडून 4 हजार रूपये ऑनलाईन पेमेंट करून घेतले व संत ज्ञानेश्वर दर्शनमंडपातून दर्शनास सोडले. संबंधित भाविकांस पेमेंट केल्याची पावती न मिळाल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी रितसर तक्रार नोंदवून पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे सुमित शिंदे यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याशिवाय, दर्शनमंडप गेटवरील रक्षक सिक्युरिटी कंपनीचे कर्मचारी अभिजीत रघूनाथ मंडळे व शुभम शामराव मेटकरी या दोन्ही कंत्राटी कर्मचा-याने विना परवाना दर्शनास सोडल्याने त्यांचेवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे तसेच रक्षक सिक्युरीटी सर्व्हीसेस ॲण्ड सिस्टम्स प्रा. लि, पुणे या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
तसेच मंदिर समितीच्या वतीने असे आवाहन करण्यात येते की, श्रींचे दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दर्शन हे संपूर्णत: निशुल्क आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी कोणासही श्री चे पदस्पर्श दर्शनासाठी आर्थिक व्यवहार करू नये.