मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमाचा समारोप
*पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 'एक वारकरी एक झाड' ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
*मुख्यमंत्र्यांचे हस्ते जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणिकेचे प्रकाशन झाले
सोलापूर, दि. १६ : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 'एक वारकरी एक झाड' ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत,आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे, संचालक नितीन गोरे, सिद्धांत कदम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' हा उपक्रम गेल्या १४ वर्षापासून राबविण्यात येत असून याला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या विभागांने आषाढी वारी पुरतेच मर्यादित न राहता राज्यातील गावा गावात पर्यावरणा विषयी नागरिकांमध्ये जनजागृतीची मोहिम राबवावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निधीची चिंता करू नये, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जगद्गुरु संत तुकाराम यांच्या 'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' या अभंगाप्रमाणे आपल्याला हरित महाराष्ट्र करावयाचा आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून वातावरणातील उद्याचा धोका टाळावयास मदत करणे आवश्यक आहे. जागा मिळेल तिथे वृक्ष लागवड करावी. एक झाड आईच्या नावाने लावून त्याचे संवर्धन करावे. असे केल्यानेच अतिवृष्टी, प्रदूषण, अवेळी पडणारा पाऊस यावर मात करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
सर्व शेती पंप सौर उर्जेवर रूपांतरित करण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा, मागेल त्याला शेततळे, वारकऱ्यांसाठी महामंडळाची स्थापना, दिंडीला २० हजार रुपये अनुदान देत आहोत. सर्व धर्मियांसाठी तीर्थ यात्रा योजना अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. संत ज्ञानेश्वर यांचे जन्म ठिकाण नेवासा येथे विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. शेतीत चांगले काम झाल्याने या वर्षी राज्याला कृषी पुरस्कार प्राप्त झाला आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.
राज्यात २० लाख हेक्टर बांबू लागवड करण्याचे धोरण आहे. त्यासाठी हेक्टरी सात लाख रुपये अनुदान देत आहोत. बांबू मुळे २० टक्के ऑक्सिजन अधिक मिळतो. सौर ऊर्जा वापर करण्यासाठी धोरण आखलेले आहे. प्रत्येक महापालिकेस एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. पंतप्रधानांनी देखील आईच्या नावे एक झाड लावण्यास सांगितले आहे. पर्यावरण समतोल सावरण्यासाठी वृक्षारोपण करण्याची गरज आहे. त्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. हरित महाराष्ट्र करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे आवाहनही श्री शिंदे यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, महसूल मंत्री श्री. विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरत ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी असा गजर करत वारकरी भक्तांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले.
*यावेळी जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणीकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.*
यावेळी महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, श्रीमती चंदाबाई तिवाडी, शाहीर देवानंद माळी, श्रीमती लता शिंदे यांच्यासह अन्य कलाकारांनी किर्तन, भारुड, पोवाडा यांच्या माध्यमातून टाळ मृदुंगात हरिनामाचा गजर करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम सादर केले.