अखेर भाजपने अभिजीत पाटलांचा पाठिंबा घेऊन डाव साधला, जनता मात्र महाविकास आघाडीसोबत
सोलापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून अखेर भाजपने डाव साधला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आपण महायुतीचा प्रचार करणार असल्याची माहिती विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे. मात्र, जनता महाविकास आघाडीच्या सोबत असल्याचे चित्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.
भाजपने विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत आणून दबावतंत्रांचा वापर करत अभिजीत पाटील यांना भाजपला पाठिंबा देण्यास भाग पाडले. त्यामुळे जनतेमध्ये रोष दिसून येत असून जनतेने महाविकास आघाडी सोबत जाण्याची भूमिका दर्शवली आहे. भाजपकडून साम-दाम-दंड-भेद अशा पद्धतीचा अवलंब केला जात असल्यामुळे जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात भाजप विषयी नाराजी आहे. अभिजीत पाटील आणि विठ्ठल परिवाराला अडचणीत आणून पाठिंबा घेतल्यामुळे भाजप विषयी मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे. याचाच फटका भाजपच्या दोन्ही उमेदवारांना बसणार असल्याची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू आहे.
अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल कारखान्यावर थकीत कर्जापोटी कारवाई झाली. यानंतर अभिजीत पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडत भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून देखील अभिजीत पाटील यांच्याकडे पाहिलं जात होते. दरम्यान, भाजपने दबावतंत्राचा वापर करत अभिजीत पाटील यांना पाठिंबा द्यायला लावल्याचे चित्र मतदारसंघात तयार झाले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप विषयी नाराजी पसरली आहे.