पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत
प्रांताधिकारी सचिन इथापे
पंढरपूर(दि.13):- आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात.पायी पालखीसोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती, महामार्गावरील रस्त्यावरुन पालखी सोहळ्यास पालखी तळाकडे जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य प्रमाणात उतार आदीबाबतची कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.
आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उप कार्यकारी अभियंता भिमाशंकर मेटकरी, नायब तहसिलदार मनोज, श्रोत्री, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ, महावितरणचे श्री. भोळे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, पालखी महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाखरी पालखी तळालगत नवीन रस्त्याचे काम सुरु असून या ठिकाणी रस्त्यांची उंची वाढविण्यात आल्याने पालखी तळावर पालखी सोहळ्यास जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य प्रमाणात उतार करण्यात यावा, भंडीशेगांव येथील चौरंगीनाथ महाराज पालखी तळाचे सपाटीकरण करण्यात यावे. पालखी मार्गावरील पाण्याच्या स्त्रोताची ठिकाणे निश्चित करावेत तसेच पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या टँकरला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेवून तात्काळ नियोजन करावे. मंदीर समितीने भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करावे. आषाढी यात्रा कालावधीत 65 एकर येथे येणाऱ्या दिड्यांची व भाविकांची संख्या विचारात घेता प्लॉटवाटपसह आवश्यक सुविधांचे नियोजन करावे.
महावितरने पाणी स्त्रोताची ठिकाणी अखंडीत वीज पुरवठा उपलब्ध ठेवावा. पालखी तळांवर तेसच शहरातील विद्युत दुरुस्तीचे कामे तात्काळ सुरु करा वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदीर समिती व नगर पालिकेने अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. आवश्यक ठिकाणी वाहन तळाचे मुरमीकरण करावे तसेच त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था, प्रसाधनगृह, माहिती आदी सुविधा द्याव्यात. जलसंपदा विभागाने कुंभार घाटाची तात्काळ दुरुस्ती करावी. अन्न व औषध प्रशासनाने पालखी मार्गावरील व शहरातील खाद्यपदार्थाच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथके नेमावेत. नगरपालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी मोहिम राबवावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध राहिल याचे नियोजन करावे अशा सुचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.भोसले म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सुरक्षेबरोबरच, वाहतुक व्यवस्था देखील महत्वाची आहे. यासाठी एसटी महामंडळाने एसटी बसेस त्यांनी निश्चित केलेल्या वाहनतळाच्या ठिकाणीच पार्किंग कराव्यात. वारी कालावधीत पाऊस असल्याने पार्किंगच्या ठिकाणी मुरमीकरण करावे. एस.टी बसेस रस्त्याच्या कडेला लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध सुविधांचे तसेच ठिकाणांची माहितीसाठी कायमस्वरूपी माहिती फलक लावावेत.पत्रा शेडमध्ये कुठल्याही स्टॉलला परवानगी देऊ नये भीमा नदी पात्रावरील दगडी पुलाच्या साईट रोलिंगचे काम करावे. अहिल्या पुलावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याने त्या ठिकाणी प्रखर प्रकाश व्यवस्था करण्यात यावी. तसेच मंदिर समितीने व नगरपालिकेने पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचनाही उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी दिल्या