इंटरनेट या प्लॅटफॉर्मचा उपयोग संशोधनासाठी करणे आवश्यक -जेष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. उदय निरगुडकर

0
इंटरनेट या प्लॅटफॉर्मचा उपयोग संशोधनासाठी करणे आवश्यक -जेष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. उदय निरगुडकर

स्वेरीत ‘भारत @ २०४७’ हे मार्गदर्शन सत्र संपन्न

पंढरपूर- ‘देशाला मोठे करायचे असेल तर सर्वप्रथम देशातील प्रत्येक नागरिक मोठा झाला पाहिजे. नागरिकच समाजाला मोठे करतो. त्यामुळे साहजिकच देश मोठा होतो. हिरोशिमा व नागासाकीवर झालेल्या अणुबाँब हल्ल्यानंतर 'जपान' खचून न जाता पुढे आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला. हल्ल्यानंतर जपान हा देश सर्व आघाड्यांवर रसातळाला गेला होता. 
जपानमध्ये गेल्यानंतर जाणवले की, तेथील नागरिक हे कमालीचे देशभक्त आहेत. जपानी जीवन पद्धतीत ‘साहस’ ही बाब मूलभूत आहे. आपला देश साहसापासून वंचित राहतो. वैचारिक जीवन जगताना आपण स्वार्थी बनतो. त्या ठिकाणी प्रथम देश, नंतर व्यक्ती हे अंगभूत धोरण आहे. कारण जपानमध्ये तेथील नागरिक एका ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करतात.जपानच्या नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार पूर्णपणे रुजलेले आहेत. आपण मानसिक गुलामगिरी झुगारून पुढे आले पाहिजे. जपान आणि भारताचा विचार केल्यास भारतातील नागरिकांनी स्मार्ट युगात उपलब्ध असलेल्या इंटरनेट या प्लॅटफॉर्मचा उपयोग संशोधनासाठी करणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. 
      गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये भारत देश हा २०४७ साली कसा असेल याबाबत आयोजिलेल्या ‘भारत @ २०४७’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ.उदय निरगुडकर हे मार्गदर्शन करत होते. डॉ.निरगुडकर यांनी संदेश फलकावरून विद्यार्थ्यांना ‘विकसित भारत के लिये कर्ता बनिये’ असा संदेश दिला. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर असताना ज्यांनी आत्मविश्वासाने क्षेत्र बदलले आणि झी २४ तास या न्युज चॅनेल मधील ‘रोखठोक’च्या माध्यमातून जबाबदार नेत्यांना, उद्योगपतींना, समाजसेवकांना व कार्यकर्त्यांना आपल्या वाणीने व प्रश्नांनी त्यांनी या सर्वांना जबरदस्त झुंजवले तसेच त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचे कार्य डॉ. निरगुडकर साहेबांनी केले. मोठ्या कंपनीपासून टीव्हीकडे त्यांनी आत्मविश्वासाने प्रवास करत असताना व सामाजिक बांधिलकी जोपासताना ‘भारत@ २०४७’ च्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना आपली भूमिका नेमकी काय असावी? हे स्पष्ट  करत जनजागृती करत आहेत' असे सांगितले. महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे समन्वयक स्वप्निल चौधरी यांनी ‘महाराष्ट्र नॉलेज सेंटर’ या संस्थेची वाटचाल, कार्य, स्वरूप व त्याची व्याप्ती सांगून राज्यातील चांगल्या बाजू ह्या भारत देशात सर्वदूर पोहोचवण्यासाठी ही संस्था कार्य करत असल्याचे सांगून ‘भारत @२०४७’ या उपक्रमाची माहिती दिली. पुढे डॉ.निरगुडकर म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाटस् अप, ट्वीटर अशा विविध सोशल मीडियाच्या मागे जास्त लागू नये. जे नको आहे ते सर्व माध्यमातून पसरवले जात आहे. 'गल्लीत तर विचारत नाही कुत्रं, आणि फेसबुकवर सतराशे साठ मित्र' अशी आजच्या तरुणांची अवस्था आहे. त्यामुळे भविष्यकाळ अवघड आहे. जोपर्यंत 'मला केवळ पक्षी बनायचे नाही तर लाखो पक्षी आपल्या कवेत घेणारे आकाश बनायचे आहे' अशी दूरदृष्टी तरुणांमध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही. आपल्या विचारातून ज्ञानगंगा निर्माण झाली पाहिजे. संपत्ती ही लुटता येते पण ज्ञानाची शिदोरी लुटता येत नाही. जीवनामध्ये त्रस्त, सुस्त, व्यस्त व मस्त अशा प्रकारची माणसे आढळतात. अभ्यासातून सर्वप्रथम आपले ध्येय समजून घेणे, त्यात आवड निर्माण करणे आणि त्यातून संशोधन करणे हे महत्त्वाचे आहे. आजचे शिक्षण आणि पाच वर्षानंतरचे शिक्षण यात खूप मोठे फरक जाणवणार आहेत. असे सांगून त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, अमेरिका, बंगालचा १९४० चा दुष्काळ, कोरोना कालावधीतील महिलांचे कार्य अशा विविध विषयांना स्पर्श केला. एकूणच स्वेरीतील विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्य वाढविण्याच्या हेतूने त्यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले असता डॉ. निरगुडकर यांनी त्यांची  समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे समन्वयक अभिजीत पाटील, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच. एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, फार्मसीच्या विद्यार्थी प्रतिनिधी पूजा बत्तुल, अभियांत्रिकी व फार्मसीच्या चारही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर विद्यार्थी संसद मंडळाच्या सचिवा राजनंदिनी पाटील यांनी आभार मानले.

समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी व विकसित भारतासाठी स्वेरी उत्तम कार्य करत आहे असे असताना विद्यार्थ्यांना अद्ययावत माहितीची आवशकता आहे. असे असल्यास अमेरिकेतील विद्यार्थी स्वेरीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी रांगा लावतील.’ या पत्रकार डॉ.निरगुडकर यांच्या विधानावर स्वेरीचे डॉ. खेडकर म्हणाले की, 'स्टडी ऑफ सोलार डिप्लॉयमेंट इन पंढरपूर’ या विषयावर संशोधन करण्यासाठी वर्जीनिया (वॉशिंग्टन, अमेरिका) येथून ‘नेहरू फुलब्राईट यु.एस. स्टुडंट रिसर्च प्रोग्राम’ च्या माध्यमातून झॅकरी मरहंका हे विद्यार्थी  एक वर्षापूर्वीच स्वेरीत संशोधन करीत असल्याचे स्पष्ट केले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !