स्वेरीचे शैक्षणिक कार्य अनुकरणीय -मुख्याध्यापक रमेश कवडे स्वेरीज् पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा पालक मेळावा संपन्न

0
स्वेरीचे शैक्षणिक कार्य अनुकरणीय -मुख्याध्यापक रमेश कवडे

स्वेरीज् पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा पालक मेळावा संपन्न

पंढरपूर– ‘स्वेरी शिक्षण क्षेत्रात देत असलेले योगदान पाहून इतर मोठमोठ्या शहरात जाण्यापेक्षा आमच्यासारख्या पालकांचा आपल्या पाल्यांना स्वेरीमध्ये प्रवेश मिळविण्याकडे अधिक कल असतो. स्वेरीमध्ये  डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग यांच्या हातून केवळ विद्यार्थीच घडतात असे नाही तर देशाचे जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य स्वेरीतून अविरतपणे होत आहे. स्वेरीतील आदरयुक्त शिस्त, विद्यार्थ्यांवरील संस्कार, वार्षिक परीक्षांचे निकाल, प्लेसमेंट, संशोधन प्रकल्प आदी शैक्षणिक उपक्रम खरोखर अनुकरणीय असतात.’ असे प्रतिपादन श्री. दुधेश्वर प्रशाला, मेंढापूरचे मुख्याध्यापक रमेश कवडे यांनी केले.
          गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा पालक मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री.दुधेश्वर प्रशाला, मेंढापूरचे मुख्याध्यापक रमेश कवडे हे मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली व स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक)चे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.ताईसाहेब साठे हया उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात प्रथम वर्षाचे विभागप्रमुख प्रा.एस.एस. गायकवाड यांनी पालक मेळावा आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट करून पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग संदर्भात अद्ययावत माहिती दिली. यामध्ये उपलब्ध सोई सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, रात्र अभ्यासिका वर्ग, तसेच शिक्षणाशी संबंधित महत्वाच्या बाबी सांगितल्या. होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना, सोलार रुफटॉप पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, जिमखाना, वाचनालयात उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची पुस्तके, मुला-मुलींसाठी स्वतंत्र असलेल्या वसतिगृहातील सुविधा, वाहतुकीसाठी बस, कॅम्पस मध्ये अतिरिक्त अभ्यासासाठी वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम यांच्यासह इतर आवश्यक सुविधा, यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांनी मिळवलेले घवघवीत यश, गुणवंत विद्यार्थी व पुढील सत्राचे नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी ‘स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी रीडिंग, रायटिंग आणि रिव्हिजन या तीन ‘आर’ वर अधिक भर द्यावा, विद्यार्थ्यानी मोबाइल पासून दूर राहून अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे. पालकांनी पाल्याच्या हितासाठी वर्ग शिक्षक, विषय शिक्षक, प्रात्यक्षिक शिक्षक, वसतिगृह अधीक्षक यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून पाल्याचे निकाल, हजेरी, प्रगतीबाबत सातत्याने चर्चा करावी. यामुळे पाल्य जागृत राहून विद्यार्थी अभ्यासाकडे आकर्षिला जातो.’ असे सांगून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख सादर केला. यावेळी ९० टक्केहून अधिक गुण मिळविणारे ४३ विद्यार्थी, गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणारे ३७ विद्यार्थी तर गणित विषयात ९७ व त्याहून अधिक गुण मिळविणारे ५८ विद्यार्थी, विविध क्रीडा प्रकारात विजेते व उपविजेते ठरलेले २१ विद्यार्थी अशा एकूण १५९ गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काही पालकांनी वाहतूक, वसतिगृह व संबंधित प्रश्न मांडले त्यावर प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ व वसतिगृह अधिक्षक प्रा.करण पाटील यांनी काही प्रश्न सोडविले तर काही प्रश्न वरिष्ठ पातळीवरून सोडविण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील सुमारे ४५० पालक उपस्थित होते. हा पालक मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रथम वर्ष विभागातील प्रा.जे.बी.रोडगे, प्रा.पी.टी.लोखंडे, प्रा.बी.जी.सरडे, प्रा.एस.ए.कुंभार, प्रा.व्ही.एस.मिस्कीन, प्रा.पी.ए. लोंढे, प्रा.ए. बी.रणदिवे, सौदागर रोंगे व आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. बी.ए. काळभोर यांनी केले तर आभार प्रा. एन.बी. जाधव यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !