भाजपकडून सोलापूरसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते यांची पहिली प्रतिक्रिया
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. 'सच्चा कार्यकर्त्यांना संधी' हे माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे आणि हे तत्व पक्ष काटेकोरपणे पाळतो, याचा खरोखर अभिमान वाटतो.
विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात मी पहिलं पाऊल टाकलं. पुढे माळशिरसच्या जनतेने दिलेल्या संधीनंतर आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन कामाला लागलो. थेट जनतेसाठी काम करण्याची ही माझी पहिली संधी होती. या संधीचं सोनं करण्यासाठी झोकून देऊन काम केलं. गोरगरिबांची दुःखं समजून घेऊन त्यांच्यासाठी शक्य ती सर्व कामे करण्याचा प्रयत्न करत आलो. या माध्यमातून माझ्यावर जनतेने टाकलेल्या विश्वासाला न्याय देण्यात मी यशस्वी ठरलो, अशी माझी प्रामाणिक भावना आहे.
यातूनच माळशिरसकरांसह सोलापूरसोबत देखील माझे ऋणानुबंध जुळले गेले आहेत. त्यामुळे पक्षाने दिलेल्या या संधीच्या माध्यमातून सोलापूरच्या जनतेसाठी काम करण्यासही मी त्याच उमेदीने सज्ज आहे. कामाची व्याप्ती वाढणार असली तरी सोलापूरमधील म्हणजे आपल्याच लोकांसाठी मला काम करायचं आहे, ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पक्षाने माझ्यावर सोपविलेल्या या जबाबदारीचा मी विनम्रतेने स्वीकार करतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जनतेच्या प्रेमाच्या जोरावर सोलापूर लोकसभा मतदारसंघातही नक्कीच मोठा विजय मिळवू, असा विश्वास आहे.
आपल्या सोलापूरला एक स्वप्ननगरी बनविण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि मा. नरेंद्र मोदी जी यांच्या कुशल हातांमध्ये पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधानपद सोपविण्यासाठी, त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करीत राहीन. माझ्या पक्षासाठी काम म्हणजे या देशाच्या हितासाठी काम! सोलापूर शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन. पुन्हा एकदा सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
सोलापूर लोकसभेसाठी संधी दिल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डा जी, राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, माझे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, यांच्यासह निवडणूक समितीचे मनापासून आभार !!