स्वेरीत ‘आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास’ कार्यशाळेचे उदघाटन

0
संकटसमयी मदतकार्य करण्यातून नेतृत्वाचा विकास  
- चेअरमन किशोरराजे निंबाळकर

स्वेरीत ‘आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास’ कार्यशाळेचे उदघाटन

पंढरपूर –‘कोणतीही आपत्ती ही सांगून येत नसते त्यामुळे आकस्मित येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण  कायम सतर्क रहावे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे  आपत्तीचे दोन प्रकार आहेत. आपत्ती समयी  काम केल्यास आपल्या नेतृत्व गुणांचा विकास होतो. सर्वप्रथम आपण भारताचे नागरिक आहोत याचे भान ठेवले तर व्यवस्थापन कार्य करताना आपल्याला एक प्रकारची उर्जा येते आणि या आपत्ती समयी  मानवाचा जीव वाचवणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य असते. अशा संकट समयी मदत कार्य केल्यास आपल्या नेतृत्वाचा विकास होतो.’ असे प्रतिपादन एमपीएससी स्पर्धा परीक्षा आयोगाचे चेअरमन किशोरराजे निंबाळकर यांनी केले.
         पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व रासेयो विभाग, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास’ या विषयावर दि.२१ मार्च ते २३ मार्च, २०२४ या दरम्यान आयोजिलेल्या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी चेअरमन राजे  निंबाळकर हे मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत आणि स्वेरी गीतानंतर प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी एमपीएससी आयोगाचे चेअरमन निंबाळकर हे पंढरपूरमध्ये प्रांताधिकारी असताना व श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी असताना केलेल्या लक्षवेधी कार्यावर प्रकाश टाकताना म्हणाले की, ‘चेअरमन निंबाळकर यांनी कोणत्याही पदावर कार्य करताना माणसे जोडण्याचे अवघड काम  केले म्हणून निंबाळकर यांना शासनाच्या विविध विभागात सचिव म्हणून काम पाहण्याची शासनाने जबाबदारी दिली. त्यामुळे निंबाळकर यांची पंढरपूरकरांबरोबर एक नाळ जोडली गेली आहे. एकूणच त्यांचे कार्य पाहिले असता माणसातला माणूस म्हणून त्यांची ओळख सर्वदूर पसरली आहे.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी स्वेरीच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. चेअरमन निंबाळकर पुढे म्हणाले की, ‘रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करताना डॉ.रोंगे सरांनी घरोघरी ज्ञानगंगा पोहोचवली. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले नेतृत्व करण्यासाठी संधी निर्माण करून दिली गेली. यातून त्यांच्या व्यवस्थापनाचे कौशल्य दिसून येते.’ असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, '२१ व्या शतकाकडे जाताना आपण मोबाईलचा वापर हा ज्ञानासाठी करावा. भारताचे चांगले आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी सर्वप्रथम फेसबुक, इंस्टाग्राम हे अॅप मोबाईल मधून डिलीट करावे कारण डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीतून चांगल्या प्रकारचे अधिकारी निर्माण होत आहेत. आपण देखील सर्वप्रथम मोठे अधिकारी होण्याची स्वप्ने बाळगा आणि ती पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्नांचा  पाठपुरावा करा. नोकरीच्या मागे न लागता आपण नोकरी देणारे बनले पाहिजे.’ हे सांगून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘स्किल डेव्हलपमेंटच्या योजना’ सांगितल्या आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरित केले. चेअरमन निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना ‘मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे आवाहन देखील केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनाचे विभागीय समन्वयक डॉ.संजय मुजमुले, उद्योजक श्रीराम परतानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक अधिकारी अर्चना बिसोई, स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस. मठपती, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रविकांत साठे, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. एम. एम. आवताडे, प्रा. के.एस.पुकाळे, प्रा. एस.बी.खडके, प्रा. बी.टी. गडदे, प्रा.जी.जी. फलमारी, प्रा.सौ. पी. व्ही. पडवळे, प्रा.मेघा सोनटक्के, प्रा. एस. डी . माळी, इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.वाय.एम.खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. या तीन दिवसांमध्ये उमा महाविद्यालय पंढरपूर, यशवंतभाऊ पाटील महाविद्यालय भोसे, दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय मंगळवेढा स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर या महाविद्यालयातील रासेयोचे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि त्याचे चालणारे कार्य याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडून विस्तृतपणे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !