15मार्च पासून श्रीच्या गाभाऱ्याचे संवर्धन कामास होणार सुरुवात
श्री विठ्ठलाचे मुखदर्शन पहाटे 5.00 ते 10.45 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
विठ्ठल मूर्ती संरक्षणासाठी आता बुलेटप्रूफ काच
पंढरपूर:- (दि.12), लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचे जतन व संवर्धन करण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता ही सर्व कामे होणार आहेत. श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फारशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि.15 मार्च पासून गर्भगृहातील कामास सुरुवात होणार असल्याने 15 मार्च पासून पदस्पर्श दर्शन बंद करुन पहाटे 5.00 ते 10.45 वाजेपर्यंत श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गाभा-यातील संवर्धनाचे काम करताना मुर्तीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, मंदिर समिती, सल्लागार परिषद, स्थानिक प्रशासकीय अधिकारी व वारकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, मंदीर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, प्रकाश जवंजाळ, दूरदृष्यप्रणालीव्दारे ॲड.माधवी निगडे तसेच सल्लागार परिषदेचे प्रसाद अंमळनेरकर, विठ्ठल वासकर, अनिल अत्रे, वारकरी संघटनेचे संजय देहूकर.राणा महाराज वासकर, बापूसाहेब उखळीकर, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद शेळके, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जून भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तहसिलदार सचिन लंगोटे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आर्किटेक्ट तेजस्विनी आफळे, कामाचे ठेकेदार उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी आर्शीवाद म्हणाले, मुर्तीस बुलेटप्रुफ दोन लेअरची काच लावून मुर्तीचे संरक्षण करण्यात येणार आहे. गर्भगृहातील काम सुरू असताना उडणारी धूळ बाहेर जाण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था संबंधित कंत्राटदारांने करावी. प्रत्येक दिवशी होणाऱ्या कामाची माहिती कंत्राटदराने रोजच्या रोज कळवावी. त्याचबरोबर ज्यादा मनुष्यबळाचा वापर करून काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. तसेच मंदिर समितीने कामाचे पूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करावे.मुखदर्शनाला येणाऱ्या भाविकांना मोबाईल बंदी करावी. चैत्री यात्रा कालावधीत दिनांक 15 ते 21 एप्रिल 2024 पर्यंत भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येणार असून दर्शन बदलाबाबत सर्व वारकरी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी केले
यावेळी मंदीर समितीचे सह अध्यक्ष सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, दि.15 मार्च पासून गर्भगृहातील कामास सुरुवात होणार असल्याने 15 मार्च पासून श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरु ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पदस्पर्श दर्शन बंद असले तरी परंपरेनुसार श्रीचे नित्योपचार सुरू राहणार आहेत.भाविकांना श्रींच्या लाईव्ह दर्शनाची व्यवस्था मंदीर समितीकडून करण्यात येणार आहे. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संपूर्ण कामाचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येत आहे. शेज आरतीनंतर गर्भगृहातील काम बंद ठेवण्यात येणार आहे. श्रीं.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-याचे संवर्धन आषाढी यात्रा 2024 पूर्वी करण्याचे प्रस्तावित असून, संबधित कंत्राटदाराने याची दक्षता घेवून काम वेळेत पुर्ण करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मंदीराचे मुळ रुप कायम ठेवून जतन व संवर्धनाचे काम करण्यात येत असून, मंदीरात लावण्यात आलेल्या चांदीचे कामही नव्याने करण्यात येणार असून, मंदिरातील सर्व चांदी काढून दुरूस्ती करून पून्हा बसविण्यात येणार आहे. पुर्वीची चांदी काढून ती वितळवून आवश्यकतेनुसार भर टाकण्यात येणार आहे. या कामासाठी समिती नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या सर्व कामाचे संपूर्ण व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. गर्भगृहातील कामासाठी 15 मार्च पासून पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात असल्याने भाविकांसाठी लाईव्ह दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकामार्फत होणाऱ्या सर्व पूजा बंद असणार आहेत. तसेच भाविकांना सहज व सुलभ मुखदर्शन घेता यावे यासाठी आवश्यक उपाययोजना मंदीर समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील काम करताना पदस्पर्श दर्शन बंद असल्याने मुख दर्शन व्यवस्था सुरु ठेवावी. तसेच कमी वेळेत मुखदर्शन मिळेल याबाबत नियोजन करावे. मंदीरात सुरु असलेल्या सर्व कामांचे चित्रीकरण करुन जतन करुन ठेवावे. मुर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे बॉक्स तयार करुन त्यामध्ये कॅमेरा बसवून मंदीर परिसरात एलईडी स्क्रीन व्दारे लाईव्ह दर्शन व्यवस्था करावी अशा सूचना उपस्थित महाराज व वारकरी संघटना यांनी यावेळी मांडल्या.