डान्स स्पर्धेतील नृत्य आविष्काराने जिंकली नागरिकांची मने
दुसऱ्या दिवशीहि भारत कृषी महोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी.
पंढरपूर/प्रतिनिधी
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुर येथे राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे आयोजन दिनांक 23 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान येथील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम व सायंकाळी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये लोकनृत्य, लावणी, मावळ्याच्या वेशभूषेतील नृत्य यासह विविध नृत्य प्रकाराने उपस्थित नागरिकांची मने जिंकली.
केडी डान्स अकॅडमीच्या माध्यमातून पंढरपुरातील कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
यातील कलाकारांना युवक नेते भगीरथ भालके यांच्या वतीने सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या महोत्सवामध्ये दिड टनाचा रेडा, पंढरपुरी म्हैस,अडीच फुटाची गाय, विविध पक्षी याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेती अवजारे, विविध गृह उपयोगी वस्तू, लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, खवय्यांसाठी खास पदार्थांची मेजवानी याचबरोबर संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत डॉग शो, कॅट शो, सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू, होम मिनिस्टर यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.प्रणिताताई भालके यांनी केले आहे.