स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे यांच्या एकसष्टी निमित्त ग्रंथतुला व सत्कार समारंभ संपन्न

आयआयटी मधून शिक्षण घेऊनही ग्रामीण भागाच्या विकासासाठीचे डॉ.रोंगे सरांचे कार्य मोलाचे-अभिनेते मकरंद अनासपुरे

स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे यांच्या एकसष्टी निमित्त ग्रंथतुला व सत्कार समारंभ संपन्न

पंढरपूर- ‘आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवळपास ८० टक्के विद्यार्थी परदेशात जातात आणि तेथे  सेवा करतात परंतु डॉ. बी.पी. रोंगे सरांनी आयआयटी मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात न जाता भारतातच राहणे पसंत केले. पंढरपूर सारख्या ग्रामीण भागामध्ये कोणतीही आर्थिक अथवा राजकीय पार्श्वभूमी नसताना पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात  इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचे अवघड कार्य त्यांनी केले ही बाब खूप गौरवास्पद आहे. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि तोच इतिहास डॉ. रोंगे सरांनी रचलाय याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मी आल्यापासून रोंगे सर काहीच बोलले नाहीत. यावरून एक लक्षात येते की जी माणसं शांत असतात ना ते खरंच खूप मोठी असतात. कारण बोलण्यापेक्षा कार्य करण्याकडे अधिक कल असणारी रोंगे सरांसारखी माणसं आपल्या जमिनीशी घट्ट चिकटून राहतात म्हणून त्यांच्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होतो. प्रत्येकाचे आयुष्य जवळपास शंभरीच्या आसपास आहे. असे असताना आपल्याला नेमके काय करायचे आहे हे जर अगोदरच ठरवले तर जीवनाचा अर्थ स्पष्ट होतो.’ असे प्रतिपादन 'नाम' फाउंडेशनचे अध्यक्ष व अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. 
        समस्त बागल परिवार व नातेवाईक यांच्या संकल्पनेतून गोपाळपूर (पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या मध्यवर्ती असलेल्या ओपन थिएटरमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या एकसष्टी निमित्त 'ग्रंथतुला व सत्कार समारंभ' हे कार्यक्रम संपन्न झाले.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते मकरंद अनासपुरे बोलत होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.बद्रिनाथ (बाबा) तनपुरे महाराज हे होते. प्रास्तविकात डॉ. विश्वासराव मोरे यांनी सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सरांच्या बालपणी पासून ते ६१ वर्षे वयापर्यंतच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे सांगितले. पुढे ते म्हणाले ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी  विशेष करून तंत्रशिक्षणासाठी तारणहार ठरलेल्या डॉ.बी.पी.रोंगे सरांनी आत्तापर्यंत शिक्षणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी दिलेले योगदान पाहता त्यांचा आजचा सत्कार हा तमाम शिक्षणप्रेमींचा सन्मान आहे.’ यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य जळगावकार महाराज यांच्या शुभहस्ते डॉ.बी.पी.रोंगे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. बी.पी. रोंगे सरांची ग्रंथतुला करण्यात आली. वेणुनगर, गुरसाळे येथील श्री.विठ्ठल सह. साखर कारखाना लिमिटेडचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील म्हणाले की, 
‘रोंगे सरांची एकसष्टी साजरी करत असलो तरी त्यांचे कार्य व उपक्रम पाहता ते तीसच वर्षाचे वाटतात. सरांचा हा प्रवास खरोखरच अनेकांना प्रेरणादायी व शिकण्याची जिद्द देऊन जातो. लहान असो की मोठा असो, ते प्रथम समजून घेतात. 'किती वर्ष जगलो यापेक्षा आपण कसे जगलो हे जास्त  महत्त्वाचे आहे' हेच सरांच्या कर्तृत्वातून स्पष्ट होते. त्यांचा दुरदृष्टीकोनातून व  मार्गदर्शनाखाली आज विठ्ठल कारखाना उर्जित अवस्थेत आला'.  माजी राज्यमंत्री शेखर चरेगावकर म्हणाले की, ‘रोंगे सरांवर बोलायचे झाले तर दिवसही पुरणार नाही. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केलेले कार्य सरस ठरते. ज्ञानाचा व भक्तीचा सुरेल संगम डॉ. रोंगे सरांच्या जीवनात पहावयास मिळतो'. पुढे बोलताना अभिनेते अनासपुरे म्हणाले की, ‘ जे ज्ञान आहे ते आपण समाजासाठी वापरले पाहीजे. समाजात आपण जे कमावले आहे ते समाजालाच परत द्यायचे आहे. खरंतर आपण झाडासारखे का राहत नाही हाच प्रश्न मला खूपदा पडतो. झाडे आपल्याला बालपणातल्या  पाळण्यापासून ते सरणापर्यंतच्या लाकडांचा  पुरवठा करतात. सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्वेरीची वाटचाल  अविरतपणे सुरू आहे. आपली परंपरा व संस्कृती  जपून विकासाचे कार्य पुढे नेणे ही सहज व साधी गोष्ट नाही. विज्ञान हा एक  रिसर्च आहे ज्यातून आपण जगात उपलब्ध आहे त्याचा शोध घेत असतो. आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचे  कार्य डॉ.रोंगे सर तंतोतंत पाळत आहेत. राजकीय परिस्थिती नसताना, आर्थिक पाठबळ नसताना, खरोखरच अभियंता मित्रांच्या सहकार्याने दृष्ट लागावी असे हे भव्य दिव्य महाविद्यालय त्यांनी उभा केले. त्यामुळे मी स्वेरीतील विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, शेतकरी बांधवांना लागणारी यंत्रसामग्री आपण येथे तयार करावी जेणेकरून शेतीची छोटी-मोठी कामे आपल्या बळीराजाला सहजपणे करता येतील.’ अध्यक्ष स्थानावरून बोलताना ह.भ.प. तनपुरे महाराज म्हणाले की, ‘स्वेरी या  संस्थेची निर्मिती होऊन २५ वर्षे झाली. या ठिकाणी ज्ञान अभूतपूर्व रीतीने विकसित झालेले आहे. अनेक जण शिक्षणासाठी शहराकडे जातात परंतु शहरातून अनेकजण आज स्वेरीत शिक्षणासाठी येत आहेत. यावरून रोंगे सरांच्या नेतृत्वाचा आणि कल्पकतेचा अनुभव येतो. रोंगे सरांनी उचललेले धनुष्य प्राध्यापक वर्ग उत्तम रिल्या पेलत आहेत.’ असे म्हणून ह.भ.प. तनपुरे महाराज यांनी अनेक अभंगाचा वापर करत डॉ.रोंगे सरांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षणतज्ञ, तंत्रशिक्षण संचालनालयाचे व एमपीएससी चे माजी सदस्य डॉ.एन.बी. पासलकर म्हणाले की, ‘शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा अशा सर्व क्षेत्रातील माणसं रोंगे सरांच्या कार्यक्रमामध्ये आज एकत्र आलेत. हा एक दुग्धशर्करा योग आहे. ज्याला अंगण राखता येतो तोच रणांगण राखतो हे रोंगे सरांच्या बाबतीत आहे. त्यांनी  इंजिनिअरिंग कॉलेज काढण्याचे स्वप्न पाहिले व नंतर ते स्वप्न सत्यात उतरवले. एवढेच नाही तर ते यशस्वीपणे चालविण्यात सातत्य देखील राखले. हा त्यांच्या  जिद्दीचा खरा विजय आहे. उत्कृष्ट निकाल, मानांकने, प्लेसमेंट, संशोधन यासाठी असणारे सर्व स्टार्स स्वेरीला मिळाले आहेत. त्यामुळे 'शहराकडे चला' ऐवजी आता 'खेड्याकडे चला' असे म्हणण्याची वेळ आली आहे.’ सत्काराला उत्तर देताना डॉ.रोंगे म्हणाले की, ‘मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या साथीने,  जिद्धीने, प्रामाणिकपणाने आणि सकारात्मक विचारसरणीने कार्य करत राहिलो.’ असे सांगून त्यांनी त्यांचे गुरु आप्पा सरांपासून ते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी दिलेल्या प्रेरणेच्या आठवणी सांगितल्या. पंढरपुरातील पत्रकार बंधुंचे  सकारात्मक सहकार्य लाभल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी तालुक्याचे नेते दीपक पवार, वालचंद कॉलेज, सांगलीचे संजय धायगुडे, स्वेरीच्या विश्वस्त व श्री.विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, डॉ. विजय कुलकर्णी, शास्त्रज्ञ डॉ.व्ही.के. सुरी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे, विजय शेलार, धनंजय सालविठ्ठल, प्रा. सी.बी. नाडगौडा, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, सर्वांचे कुटुंबीय, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रेखा चंद्रराव व वैजिनाथ रणदिवे यांनी केले तर आभार डॉ. विश्वासराव मोरे यांनी मानले.
चौकट- क्षणचित्रे- ग्रंथतुला करताना खूप पुस्तके दुसऱ्या पारड्यात सामावली त्यानंतर सरांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रेमलता रोंगे यांनी ज्ञानेश्वरी पुस्तक पारड्यात ठेवताच पारडे जड झाले. या योगायोगाचे अभिनेते अनासपुरे यांनी सुंदर स्पष्टीकरण दिले. ‘नाम फाउंडेशन’चे कार्य अजूनही सुरु असून अद्यापपर्यंत ६०० गावात काम केले असल्याचे सांगून युवकांनी सोशल मिडीयाचा वापर योग्य रीतीने करण्याचे आवाहन अभिनेते अनासपुरे यांनी केले. सर्व पाहुण्यांना विठ्ठलाची आकर्षक मूर्ती देवून स्वागत करण्यात आले. स्वेरीचे विश्वस्त एच.एम.बागल यांचाही वाढदिवस असल्यामुळे पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पालक, विविध गावातील शिक्षणप्रेमी नागरिक यांनी उपस्थित राहून डॉ. रोंगे सरांचा सत्कार केला.

Post a Comment

Previous Post Next Post