स्त्रियांनी स्वतःमधील गुणवत्ता ओळखून पुढे येण्याची गरज-सीआयडी ब्रँचच्या पो.नि. सौ.अर्चना हाके- पाटील
स्वेरीत ‘महिला जनजागृती’ कार्यक्रम संपन्न
पंढरपूर- ‘मुलींनी छोट्या छोट्या गोष्टींमधून धडे घेतले पाहिजेत कारण समाजात स्त्री ही मोठी शक्ती असून ती स्वतः घडता घडता कुटुंबियांना घडवते. राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासून ते आत्तापर्यंतच्या कर्तबगार महिलांची उदाहरणे घेतली तर त्यातून अनेक बाबी स्पष्ट होतात. जॉब, करिअर, जबाबदाऱ्या, मातृत्व, नेतृत्व या टप्प्यांतून जाताना स्त्रियांना तारेवरची कसरत करावी लागते. कोणतीही तक्रार न करता घेतलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत कौशल्याने त्या पार पाडत असतात. स्त्री ही दुबळी नसते. तिच्यामध्ये चातुर्य, क्षमता, कल्पकता, सहनशीलता, धाडस, भावनिकता असे विविध गुण सामावलेले असतात. एकूणच तिचे एक स्वतंत्र अस्तित्व असते आणि ती स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करत असते. स्त्रियांनी स्वतःमधील गुणवत्ता ओळखून त्यांनी पुढे येण्याची गरज आहे.’ असे प्रतिपादन मुंबई सीआयडी ब्रँचच्या पोलीस निरीक्षक सौ. अर्चना हाके- पाटील यांनी केले.
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विशेष करून विद्यार्थीनींसाठी आयोजित केलेल्या ‘महिला जनजागृती’च्या या कार्यक्रमामध्ये मुंबई पोलीस खात्यातील सीआयडी ब्रँचच्या पोलीस निरीक्षक सौ. अर्चना हाके- पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होत्या. दीप प्रज्वलनानंतर पोलीस निरीक्षक सौ. अर्चना हाके- पाटील यांनी विद्यार्थीनींना ‘टेक एव्हरी सिंगल अपॉर्च्युनिटी अँड बी द बेस्ट’ हा मेसेज दिला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी प्रास्ताविकामध्ये ‘महिलांमध्ये जनजागृती करणे का आवश्यक आहे? याची माहिती देवून आयोजिलेल्या कार्यक्रमाचा हेतू सांगितला. त्याचबरोबर स्वेरीच्या शिक्षण पद्धतीची माहिती देवून मागील २५ वर्षांपासून महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थिनींच्या धाडसाचे अनुभव डॉ. रोंगे यांनी सांगितले. स्त्रियांचे अस्तित्व म्हणजे काय? हे स्पष्ट करताना पोलीस निरीक्षक सौ. हाके- पाटील पुढे म्हणाल्या की, ‘स्त्रीला स्वतःचा सन्मान स्वतः मिळवावा लागतो. स्त्री ही सर्वांची काळजी घेत असताना आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या पिढीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिअरच्या नावाखाली आपण आपली प्रकृती खराब करतो, दुर्लक्ष करतो. श्रद्धा किंवा अंधश्रद्धेला बळी पडू नका. आर्थिक मॅनेजमेंट पुरुष जरी करत असला तरी त्याचे खरे नियोजन स्त्री उत्तमरित्या करते. स्वतःची स्वतंत्र विचारसरणी, कर्तव्य व जबाबदारी ओळखा आणि त्यानुसार वागा, स्वतंत्र विचारसरणी ठेवा.’ असे सांगून त्यांनी ‘महिला सक्षमीकरणाची’ व्याख्या स्पष्ट केली तसेच त्यांनी मुंबई क्राईम ब्रँच मध्ये जबाबदारी पार पडताना आलेले अनुभव व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयातील अॅड.अभिमान हाके-पाटील यांनी ‘विद्यार्थीनींनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः सक्षम बनले पाहिजे. तसेच सध्याचे युग गतिमान झाले असून वेगाच्या युगात सायबर गुन्ह्यांत देखील वाढ होत आहे. यासाठी स्त्रियांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. स्त्रियांनी सोशल मीडियाचा वापर देखील कमी व काळजीपूर्वक करावा. आपले फोटो शक्य करून सोशल मिडीयावर अपलोड करू नयेत याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’ असे सांगून त्यांनी एमपीएससी व युपीएससी अशा स्पर्धा परीक्षा देताना घ्यावयाची काळजी व त्याचा अभ्यास कसा करावा? याची सविस्तर माहिती दिली. यावर विद्यार्थिनींनी अनेक प्रश्न विचारले असता पोलीस निरीक्षक सौ.अर्चना हाके-पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील, डॉ. हर्षवर्धन रोंगे,इतर प्राध्यापिका व स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर अंतर्गत तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी आभार मानले.