अनवलीमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या
राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर’ संपन्न
पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.११ जानेवारी पासून ते मंगळवार, दि.१७ जानेवारी २०२३ या कालावधीत अनवली (ता.पंढरपूर) मध्ये ‘युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास’ या दिलेल्या विषयावर 'विशेष श्रमसंस्कार शिबिरा’ चे आयोजन केले होते. अनवलीचे सरपंच प्रतिनिधी समाजसेवक गजेंद्र शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले तर रासेयोचे विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी या शिबिराचा समारोप करण्यात आला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व अनवलीकरांच्या बहुमोल सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.
स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, कॅम्पस इनचार्ज प्रा. एम. एम. पवार आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.हेमंत बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील एकूण ५० विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या रासेयोच्या शिबिरात सहभाग घेतला होता. या शिबिराच्या माध्यमातून आठवडाभर समाजोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रभातफेरी, शैक्षणिक विकास, श्रमदान, वृक्षारोपण, बाल विवाह निर्मूलन, पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती, सामाजिक एकोपा, पर्यावरणाचा विकास, महिला आरोग्य विषयक समस्या व आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती, आरोग्यावर जनजागृती, परिसर स्वच्छता अभियान आदी विषयांवर प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आले.
यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचेही मार्गदर्शन लाभले. प्रारंभी बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांनी ग्रामस्थांचे व पाहुण्यांचे स्वागत केले आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याबद्दल माहिती सांगून शिबिराचे महत्व आणि त्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी बोलताना पोलीस पाटील तौफिक शेख म्हणाले की ‘विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी हा परिपूर्ण घडत असतो. हे संस्कार विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये अत्यंत उपयोगी पडणार आहेत.' स्वेरी फार्मसीच्या रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.हेमंत बनसोडे म्हणाले की, ‘संपूर्ण आठवडाभर आमच्या विद्यार्थ्यांना अनवली मधील ग्रामस्थांचे व नागरिकांचे सहकार्य लाभले. त्यामुळे नियोजनाप्रमाणे विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविता आले. यावेळी अनवलीचे सरपंच प्रतिनिधी गजेंद्र शिंदे, माजी उपसरपंच संजय माळी, पोलीस पाटील तौफीक शेख, ग्रामसेवक रमेश म्हारणुर, ज्ञानेश्वर बारले, अविनाश बारले, सुधीर कुलकर्णी, सचिन शिंदे, दत्तात्रय डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप डिसले, वल्लभ घोडके, यांच्यासह अनवली ग्रामस्थ तसेच स्वेरी फार्मसीचे डॉ. वृणाल मोरे डॉ.ए.व्ही लांडगे, प्रा.प्रदीप जाधव, प्रा.ऋषिकेश शेळके, प्रा.सिद्धिका इनामदार, प्रा.एल.एन.पाटील, इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.हेमंत बनसोडे यांनी समारोपाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी आभार मानले.