ई-रुपी चलनामुळे भारत आर्थिक महासत्ता होईल – सीए संजीवभाई कोठाडिया
पंढरपूर – “देशातील काळा पैसा नष्ट करून सरकारचे उत्पन्न वाढले पाहिजे. सरकारकडे मोठ्या प्रमाणात धन उत्पन्न झाल्यास त्यातून विकासाची कामे
मोठ्या प्रमाणात करता यावीत. लोकांना करात सवलत देता यावी. कर भरणारांची संख्या वाढावी. आर्थिक गैर व्यवहारावर अंकुश ठेवता यावा. नोटा छपाई वरील
खर्च बंद करावा. देशातील आतंकवाद व भ्रष्ट्राचार कमी व्हावा. यासाठी सरकार उपाय योजना करत असून ई-रुपी हा त्याचाच एक भाग आहे. जगातील अनेक
देशांनी ई-रुपी व्यवहारास मान्यता दिली असल्याकारणाने अमेरिकेच्या डॉलर या चलनाची मक्तेदारी मोडीत निघेल आणि भारत हा आर्थिक महासत्ता होईल.” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आर्थिक तज्ज्ञ सीए संजीवभाई कोठाडिया यांनी केले.
महाविद्यालयात रुसा कॉम्पोनंट आठ अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनी समितीच्या वतीने आयोजित ‘ई-रुपी व्यवहाराचे स्वरूप, आव्हाने आणि उपाय’ या विषयावर
प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष
रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संजीव पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत
खिलारे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य प्रा. अप्पासाहेब
पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब शिंदे, पर्यवेक्षक प्रा. युवराज आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सीए संजीवभाई कोठाडिया पुढे म्हणाले की, “भारत हा आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने पाऊले टाकत आहे. कोव्हीड 19 या जागतिक महामारीच्या काळात ऑनलाईन आर्थिक देवाण घेवाणीचे प्रमाण वाढले असून अशा स्वरूपाचे व्यवहार करणारे शेतकरी, शेतमजूर आणि छोटे व्यापारी यांचे प्रमाण अधिक
आहे. देशात सर्वत्र फोरजी नेटवर्क सिस्टीम कार्यरत आहे. देशात मोबाईल वापर करणाराचे प्रमाण हे ऐंशी टक्क्याहून अधिक आहे. आरबीआयने देशातील सर्व आर्थिक व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून नियंत्रित करण्याचे ठरविले आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाती, वोटर कार्ड, सात बारा उतारे, घर जमिनीचे उतारे ह्या सर्व गोष्टींची लिंक प्रकिया अधिक गतीशील केली आहे. चलन छपाई, डुप्लिकेट नोटा, कर बुडवे, कर चोरी या सर्व
बाबी नष्ट करून आर्थिक प्रक्रिया सुधारण्यासाठी सरकार सातत्याने उपाय योजना करत आहे.”
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सीए संजीव पाटील म्हणाले की, “कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करून फेसलेस व्यवहार करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. तंत्रज्ञानाचा वापर हा लोकांच्या जीवनाचा पार्ट बनत चालला आहे. आर्थिक साक्षरता आणि तंत्रज्ञान अवगत करणे ही काळाची गरज बनली असून
आर्थिकदृष्ट्या सजग असणे आवश्यक आहे. केंद्र सरकार आर्थिक क्षेत्रासंबंधित धोरणे वारंवार बदलत आहे. त्यामुळे बदललेल्या नियमांचा आणि धोरणाचा अभ्यास करून आपले नुकसान टाळता आले पाहिजे. आर्थिक नियम पाळले तर शांत झोप लागते त्यामुळे प्रकृती स्वास्थ्य व्यवस्थित राहते.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे यांचे स्वागत आणि परिचय प्राध्यापक प्रबोधिनीचे चेअरमन डॉ. दत्तात्रय डांगे यांनी करून दिला. या कार्यक्रमास
सिनिअर, जुनिअर व व्यवसाय अभ्यासक्रम विभागाकडील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.
दादासाहेब आरेकर, डॉ. तुकाराम अनंतकवळस, प्रा. सीताराम सावंत, प्रा. राजेंद्र मोरे, सुरेश मोहिते, अमोल माने, ओंकार नेहतराव, महेश सोळुंखे,
अभिजित जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. धनंजय वाघदरे
यांनी मानले.