भ्रष्टाचार दाखवा व एक लाख रोख मिळवा
देगाव ग्रामपंचायतीचा आणखी एक धाडसी निर्णय
पंढरपूर प्रतिनिधी: पंढरपूर तालुक्यातील उपक्रमशील ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देगाव ग्रामपंचायतीने आणखी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास अगर भ्रष्टाचार आढळल्यास रोख एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे या ग्रामपंचायतीने जाहीर करून आपली ग्रामपंचायत व स्वच्छ कारभार करणारे आहे हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे.
पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत कोरोना काळात राबवलेल्या यशस्वी उपाययोजनांमुळे व प्रभावी लसिकरणामुळे चर्चेत आली होती.सोबतच या ग्रामपंचायतीने गेल्या महिन्यापूर्वी दोन तास अभ्यासासाठी हा उपक्रम सुरू केला होता. जो संपूर्ण राज्यभर गाजला.सोबतच जिल्हा परिषद शाळेत सर्व वर्गांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवणारी ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.या उपक्रमाची यशस्वी वाटचाल सध्या सुरू असून यातच कोट्यावधीची विकासकामेही या ग्रामपंचायतीच्या मार्फत सुरू आहेत.या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सीमा संजय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत यशस्वीपणे विकासाची वाटचाल करत असून भ्रष्टाचार मुक्तीकडे व स्वच्छ कारभाराकडे या ग्रामपंचायतीने वाटचाल सुरू केलेली आहे.थेट भ्रष्टाचार दाखवण्याचे आवाहन करून रोख स्वरूपात बक्षीस देण्याची घोषणा करणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली असून या ग्रामपंचायतीने आजपर्यंत गेल्या दोन वर्षात अनेक कौतुकास्पद व मोठे उपक्रम राबवून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो याची माहिती घ्यावी, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचा कारभार योग्यरीत्या चालू आहे की नाही, कोणत्या योजना कशा प्रकारे राबवल्या जात आहेत, कशाप्रकारे राबवल्या जाव्यात याबाबत मार्गदर्शन व माहिती या निमित्ताने लोकांकडून घेतली जावी यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे मत ग्राम पंचायतीने व्यक्त केले आहे.तसेच प्रत्येक नागरिक जर ग्रामपंचायतीत सगळी माहिती घेऊ लागला तर भ्रष्टाचार कमी होऊन गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.
लोक कल्याणासाठी निर्णय
"ग्रामपंचायत ही गावच्या विकासासाठी काम करणारी संस्था असून ती चांगल्या लोकांच्या हाती असणे आवश्यक आहे.सोबतच या संस्थेत लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायला हवा.तसेच चांगल्या कामासाठी सहकार्य व चुकीच्या कामासाठी विरोध करायला हवा.ज्यामुळे लोक सहभाग वाढून भ्रष्टाचार कमी होईल व कामे अधिक चांगली व वेगाने होतील.ह्याच हेतूने आम्ही हा उपक्रम चालू केला असून निदान बक्षीस मिळेल या आशेवर तरी जास्तीत जास्त लोक ग्रामपंचायतीचा कारभार जवळून पाहतील व भविष्यात कुणीही प्रमुख असला तरी भ्रष्टाचारास आळा बसेल. "
सौ.सीमा संजय घाडगे
सरपंच ग्रामंचायत देगाव