भीमा, आदिला नद्या सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान

0
भीमा, आदिला नद्या सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान

चला जाणूया नदीला...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत  ‘चला जाणूया नदीला’ अभियानाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात दि. 26 ते 30 डिसेंबरदरम्यान नदी संवाद यात्रा होत आहे. ‘चला जाणूया नदीला’ अभियानात सोलापूर जिल्ह्यातील कासाळगंगा, भीमा, कोरडा, आदिला, दुबदुबी आणि माणगंगा नद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी भीमा आणि आदिला नद्यांची माहिती देणारा लेख….
एखादी संस्कृती निर्माण होते ती पाण्यामुळे आणि अर्थातच लयाला जाते तीही पाण्यामुळे. गुप्त झालेल्या किंवा कोरड्या पडलेल्या नद्यांनी माणसांसह त्या परिसरातील जीवसृष्टीला हानी पोचल्याची उदाहरणे इतिहासात अनेक आहेत. गंगा-सिंधूच्या बरोबरीनं नाव घेतल्या जाणाऱ्या सरस्वती नदीचं अस्तित्व नाही. त्यामुळं एक संस्कृती लयाला गेली. आज जिथं वाळवंट आहे, तिथं एकेकाळी समुद्र होता, असं संशोधन समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर नद्यांचे महत्त्व नेमकेपणाने जाणून घेण्याची गरज आहे.
भीमा नदी -
       भीमा जलसंस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. सुमारे एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ज्या भीमा खोऱ्यात राहते, ज्या नदीच्या पाण्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे, तिची समृद्धी महत्त्वाची आहे. भीमा नदीचा प्रवाह उगमापासून संगमापर्यंत साधारणपणे पावणे नऊशे किलोमीटर आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथल्या उगमापासून कर्नाटकातील रायचूर इथं कृष्णेशी संगमापर्यंत या नदीनं ४६ हजार १८४ किमीचं पाणलोट क्षेत्र व्यापलं आहे. अनेक नद्यांचा तिच्यात संगम झाला आहे. २७ धरणं तिच्यावर बांधली गेली आहेत. पुणे, नगर, सातारा, सोलापूर, बीड, उस्मानाबाद हे सहा जिल्हे पूर्णपणे आणि काही अंशतः भीमेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नऊ वीजप्रकल्प या पाण्यावर आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे मेट्रोपोलिटन रिजन (पीएमआर) दिवसेंदिवस वाढत आहे. 
भीमेच्या काठावर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर (भीमेचा इथे उगम होतो), पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेलं सिद्धटेक, नीरा-भीमा संगम स्थळावरील नरसिंहपूर, श्रीविठ्ठलाचं पंढरपूर, भीमा-सीना संगमावरील हत्तरसंग कुडल (श्रवणबेळगोळच्याही आधीचा पहिला शिलालेख इथे सापडला), भीमा-अमरजा संगमावरील श्रीदत्ताचे गाणगापूर (कर्नाटक) अशी महत्त्वाची अध्यात्मपीठे नदीकिनाऱ्यावर वसली आहेत. मानवी जीवनव्यवहाराशी त्यांचा निकटचा संबंध आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगाव हे भीमा खोऱ्यातील संस्कृतीचं मोठं उदाहरण आहे. तिथं उत्खनन झालं आहे आणि जलसंस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. 
आदिला नदी
         आदिला नदीचे पाणलोट क्षेत्र हे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विभागले आहेत. त्यात उत्तर सोलापूरमधील २३, दक्षिण सोलापूरमधील १४ आणि तुळजापूर तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे. आदिला नदीचा उगम उस्मानाबाद जिल्ह्यातील धनेगाव येथे होतो आणि सोलापूर जिल्ह्यातील तेलगाव सीना नदीमध्ये संगम होतो. आदिला नदीच्या पाणलोट क्षेत्रात येणारा एकरूख तलाव (हिप्परगा तलाव) सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत आहे.
       
  आदिला नदीच्या पाणलोट क्षेत्रात एकरूख तलावाला धरून एकूण छोटे मोठे 13 तलाव व पाणीसाठे आहेत. प्रामुख्याने ह्या क्षेत्रामध्ये ऊस, गहू, ज्वारी, सोयाबीन, भाजी पाला याची शेती केली जाते. एकरूख तलावाची एकूण साठवण क्षमता ही 2 टीएमसी इतकी आहे. मार्डीचे यमाई देवी मंदिर, सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज मंदिर, सावरगाव येथील जैन मंदिर अशी अनेक मंदिरे या पाणलोट क्षेत्रात येतात.  
              आदिला नदीचे पाणलोट क्षेत्रफळ 724.24 चौ.किलोमीटर आहे. पाणलोट क्षेत्रातील एकूण लोकसंख्या 14 लाख 74 हजार 164 इतकी आहे. पाणलोट क्षेत्रातील सरासरी पर्जन्यमान 463 मिमी आहे. आदिला नदीच्या एकूण प्रवाहाची लांबी 990.93 किमी आहे. प्रवाहाची घनता 1.36 इतकी आहे. नदीचे क्षेत्र समुद्र सपाटी पासून जास्तीत जास्त 588 मी. आणि कमीत कमी 430 मी. उंचीवर आहे.  पाणलोट क्षेत्राचा उतार हा 580 मी.पासून 430 मी. इतका आहे.
'चला जाणूया नदीला' या उपक्रमात नदीकाठच्याच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावचे आबालवृद्ध जोडले गेले आणि आपापल्या गावाच्या विकासाबद्दल विचार करायला लागले तर आपल्या जिल्ह्यात मोठी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.

- रजनीश जोशी,
- नदी समन्वयक, 
- मोबाईल : ९८५००६४०६६
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !