पंढरपूर येथे मुंबईहून आलेल्या भाविकांना विषबाधा
पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रूक्मिणी दर्शनासाठी आलेल्या सुमारे ३० पेक्षा जास्त भाविकांना पंढरपूर येथे जेवणातून विषबाधा झाली आहे.मंदिरासमोरच असलेल्या चंद्रभागा नदीकाठीच्या एका हॉटेलमध्ये हे भाविक जेवल्याची माहिती मिळत आहे. हे भाविक मुंबईतील असल्याचे समजते.
जेवण झाल्यानंतर उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पंढरपूरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामधील काही भाविक गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच नगरपालिका व जिल्हा आरोग्य विभागाची टीम सतर्क झाली असून मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यानी देखील हालचाली सुरू केल्या आहेत. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता अन्न व औषध विभागाची टीम देखील पंढरपूरात दाखल झाली आहे.दरम्यान पोलिसांकडून देखील या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, संपूर्ण महाराष्टाचे आराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यभारातून आणि राज्याबाहेरील लाखो भाविक येथे येत असतात. यावेळी विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन झाल्यावर चंद्रभागेत स्नान करत असतात. दरम्यान, विषबाधा झालेले सर्व भाविक हे मुंबईतील असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता नेमकं काय घडलं हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.