ग्रामपंचायत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
चार टेबलवर 13 फेऱ्यात होणार मतमोजणी
पंढरपूर दि.19:- पंढरपूर तालुक्यातील एकूण दहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून. मतमोजणी प्रक्रिया मंगळवार दि. 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे होणार आहे. यासाठी सर्व मतमोजणी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत, खेडभोसे, नेमतवाडी, बार्डी, खरातवाडी, मेंढापूर, होळे, आजोती, पुळुजवाडी, टाकळी गुरसाळे या ग्रामपंचायतींची 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतमोजणी करिता 04 टेबलची रचना करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी एकूण 13 फेऱ्या निश्चित करण्यात आलेल्या असून, मतमोजणीसाठी तहसीलदार, अपर तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार यांच्या पर्यवेक्षणाखाली 11 निवडणूक निर्णय अधिकारी, 04 मंडळ अधिकारी, 11 तलाठी, 06 महसूल सहाय्यक, 15 कोतवाल व शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतमोजणीकरीता उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून ओळखपत्रे वितरित करण्यात आली असून ,ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार नाही. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सर्व उमेदवार प्रतिनिधी यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनात सहकार्य करावे असे, आवाहनही तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे.