दिलीप कुमार यांचा आज 100 वा वाढदिवस
जगभरात भारतीय चित्रपटसृष्टीला ओळख मिळवून देणाऱ्या महान कलाकारांमध्ये दिलीपकुमार, लता मंगेशकर, राज कपूर, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांचा आवर्जून उल्लेख करता येतो.यांच्या अफाट प्रतिभा व अष्टपैलु बहुस्तरीय वाटचाल यावर 'फोकस ' टाकावा तेवढा थोडाच.... ११ डिसेंबर १९२२ हा दिलीपकुमारचा जन्मदिवस. म्हणजेच त्याचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे.
दिलीपकुमारबद्दल कितीही सांगावे तरी तो जणू ट्रेलर ठरावा. सेटवरील दिलीपकुमारचा एक अनुभव.
स्थळ- गोरेगावच्या चित्रनगरीतील कोर्टाचा सेट.
उमेश मेहरा दिग्दर्शित 'किला' (१९९८) चे शूटिंग सुरु आहे. सेटवर दिलीपकुमार, रेखा, स्मिता जयकर आणि अनेक ज्युनिअर आर्टिस्ट आहेत.
संपूर्ण सेटवर दिलीपकुमारचे अस्तित्व, प्रभाव जाणवतोय. दिलीपकुमार आपल्या आजच्या दिवसभराच्या दृश्याची सगळी माहिती करुन घेतो, उद्याचे प्रसंगही समजावून घेतो. आपले तर झालेच आपल्या समोरच्या/ बरोबरच्या कलाकारांचे संवाद नीट जाणून घेतो. मग कॅमेरा नेमका कुठे आहे, तो कुठून कसा कुठे जाणार हेही सगळे विचारुन घेतो.
थोडा वेळ तो स्वतःशीच काही विचार करतो आणि आपल्या मनात आलेल्या शंका दिग्दर्शकाला विचारतो. त्याला ते बहुतेक अपेक्षित असावे. तो तितक्याच शांतपणे दिलीपकुमारचे समाधान करतो. मग दिलीपकुमार एकेक करत अनेकदा रिहर्सल करतो. मग म्हणतो, चलो टेक करते है.. एक टेक होतो. पण दिलीपकुमारचे समाधान होत नाही. दुसरा टेक होतो. तिसरा होतो. चौथा होतो.. बारा-तेरा टेकनंतर शाॅट ओके होतो आणि दिलीपकुमार एका बाजूच्या खुर्चीत जाऊन बसतो. स्मिता जयकर यावर माझे एक्प्रेशन पाहते. तिच्या आग्रहास्तव मी या चित्रपटाच्या सेटवर आलो होतो. तिला इतक्या मोठ्या कलाकारासोबत भूमिका साकारायला मिळाल्याने मी तिची मुलाखत घेतली होती.
दिलीपकुमारला प्रत्यक्षात अभिनय करताना पाहून मी सुखावलेला असतो. पत्रकारितेने मला हा आनंद दिला होता. तत्पूर्वी, मी दिलीपकुमारची भूमिका असलेल्या सुभाष घई दिग्दर्शित कर्मा, के. बापय्या दिग्दर्शित रास्ता आणि इज्जतदार तसेच खुद्द दिलीपकुमारच दिग्दर्शित किला (९१) या चित्रपटाच्या मुहूर्ताला आवर्जून हजर राहून दिलीपकुमार आपल्या कामात कशा पद्धतीने आणि कितपत खोलवर रस घेतो हे प्रत्यक्षात अनुभवले होते.
अभिनय सम्राट, अभिनयाचा महामेरु, अभिनयाची संस्था, अभिनयातील कोहिनूर, अभिनयाचे विद्यापीठ, अभिनय बादशाह, ट्रॅजेडी किंग अशा अनेक वैशिष्ट्यांमधून दिलीपकुमारचा प्रवास कायमच तोलला , मोजला जातो. यापुढेही ते सुरुच राहिल. तरीही ते मोजणे अपुरे ठरते आणि यातच या महान अभिनेत्याचे मोठेपण आहे.
ते त्याचे यश आहे. स्वतःला घडवत घडवत आकाराला आलेला कलाकार असे त्याच्याबद्दल म्हणता येईल. दिलीपकुमारचा पहिला चित्रपट अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित व बाॅम्बे टाॅकिज निर्मित 'ज्वार भाटा' (४४) पासून बरेच काही सांगता येईल. शहीद लतिफचा आरजू (५०), एस. यू. सनीचा 'बाबूल (५०), केदार शर्माचा जोगन (५०), नीतिन बोसचा 'दीदार (५१), अमिया चक्रवर्तीचा दाग (५२) या चित्रपटांनी दिलीपकुमारची 'ट्रॅजेडी किंग' ही त्याच त्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण ओळख झाली, पण त्याच चौकटीत या महान अभिनेत्यास जोखणे योग्य नाही. त्याच्यावर ते अन्याय करणारे ठरेल.
प्रतिमेची हीच चौकट अथवा ओळख त्यानी एस.एम. एस. नायडूचा आझाद (५४), बी. आर. चोप्राचा नया दौर (५७), बिमल रॉयचा मधुमती (५८), एस. यू. सनीचा कोहिनूर (६०) या चित्रपटातून यशस्वीपणे मोडली. के. असिफ निर्मित व दिग्दर्शित सर्वकालीन बहुचर्चित मुगल-ए-आझम (६०) याच उत्तुंग करियरचा हायपाॅईंट चित्रपट. पाठोपाठ गुणवत्तेची हीच इमारत नीतीन बोस दिग्दर्शित गंगा जमुना (६१)ने मजबूत केली.
अफगाणिस्तानच्या वेशीवर असलेल्या पेशावर येथे या युसुफ खानचा जन्म झाला. फळविक्रेते महंमद सरवरखान पठाण व आयेषा बेगम हे युसुफ खानचे माता-पिता. हे एकूण सहा भाऊ आणि सहा बहिणी असा मोठाच परिवार. काही वर्षांनी हे कुटुंब नाशिकजवळील देवळाली येथे आले. (हा स्वातंत्र्यपूर्वीचा काळ) युसुफ काही कारणास्तव कुटुंबापासून दूर राहत असतानाच एकदा अभिनेत्री देविका राणी यांचे डाॅक्टर मसानी यांनी युसुफला मुंबईत जाऊन देविका राणीची भेट घेण्यास सांगितले.
काही तरी नोकरी मिळेल असाच युसुफचा हेतू होता. पण घडले वेगळेच व चांगलेही. जणू एक नवीन पर्व सुरु झाले. देविका राणीनी युसुफ खानला बाॅम्बे टाॅकिजच्या चित्रपटाचा नायक म्हणून निवडले आणि तेव्हाच त्याला नावही बदलायला सांगितले. चित्रपट कलाकाराचे नाव बदलायचे ही प्रथा तशी खूपच जुनी. बाॅम्बे टाॅकिजच्या लेखन विभागातील नरेंद्र शर्मा यांनी वासुदेव, जहांगीर व दिलीपकुमार अशी तीन नावे सुचवली.
देविका राणी यांनी 'दिलीपकुमार' हे नाव निश्चित केले आणि एका नवीन सामाजिक, सांस्कृतिक अशा मोठ्या इतिहासाचा जणू जन्मच झाला. काळ जस जसा पुढे सरकला, सामाजिक सांस्कृतिक वातावरण बदलत राहिले. तस तसा दिलीपकुमार नावाचा एक प्रचंड दबदबा निर्माण झाला. त्या काळात दिलीपकुमारचा एकेक चित्रपट किमान वीस-पंचवीस वेळा पाहणारे फिल्म दीवाने अगणित. त्यातील अनेकांनी आज वयाची सत्तरी/ पंचाहत्तरी ओलांडली आहे पण आजही ते भावनिकदृष्ट्या घट्ट जोडलेले आहेत.
दिलीपकुमारचा त्यात ट्रॅजेडी किंग ते अॅग्री ओल्ड मॅन असा प्रवास आहे. 'शक्ती'मध्ये दिलीपकुमार व अमिताभ बच्चन यांच्यातील अभिनयाचा सामना पाहणे एक अनुभव आहे. आजही ओटीटीवर हा चित्रपट आवर्जून बघा. दिलीपकुमारने मोजक्याच चित्रपटातून आपले अस्तित्व अधोरेखित करत आपले साम्राज्य निर्माण केले. असे साम्राज्य आणि सामर्थ्य की राजेन्द्रकुमार, मनोजकुमारने आपल्यावरचा दिलीपकुमारचा प्रभाव कधीच नाकारला नाही.
सुरुवातीच्या दिवसातील अमिताभ बच्चनवरही दिलीपकुमारचा प्रभाव कळत नकळतपणे दिसतो. तर दीवाना, दिल आशना है या चित्रपटातील शाहरूख खान पाहताना माझ्यासोबतच्या मागील पिढीतील चित्रपट समिक्षकाना सुरुवातीच्या दिवसातील दिलीपकुमारचे बाबुल, जोगन हे चित्रपट आठवले. मला आठवतय, ब्राॅडवे मिनी थिएटरमधील 'दीवाना'च्या प्रेस शोच्या वेळी जुन्या पिढीतील चित्रपट समीक्षकांत हीच चर्चा होती. दिलीपकुमार विविध स्तरावर बदलत व घडत गेलाय. कधी शिकतही राहिला. प्रचंड यशानंतर काही गणिते फसतात. आणि त्यातूनच चित्रपटाचा समतोल बिघडू शकतो. प्रेक्षकांना हे अजिबात आवडत नाही.
दिलीपकुमारही या सगळ्याला अपवाद ठरला नाही. साठच्या दशकातील चित्रपट समिक्षकांचे अगदी रोखठोक मत होते आणि हे सगळेच चित्रपट सुपर फ्लॉप झाले. त्या पडत्या काळात दिग्दर्शक चाणक्यच्या राम और श्याम (६७) च्या यशाने दिलीपकुमारची पत व लोकप्रियता वाचवली. तर असित सेनच्या बैरागच्या (७६)च्या रिशूटींगचा दिलीपकुमारचा अति आग्रह थट्टेचा विषय झालाच आणि त्याची तिहेरी भूमिका असणारा हा भरकटलेला चित्रपट फ्लाॅपही झाला.
या चित्रपटात तो ग्रामीण रुपातील दिलीपकुमारने सायरा बानूचा साकारलेला नायक छान शोभला. पण शहरी दिलीपकुमारने आपल्या वयापेक्षा खूप लहान अशा लीना चंदावरकरचा नायक साकारुन आपले हसे करून घेतले. आजही या गोष्टीची थट्टा होते. सुभाष घई दिग्दर्शित 'सौदागर'मुळे 'पैगाम (५९) नंतर तब्बल ३२ वर्षांनी दिलीपकुमार व राजकुमार एकत्र आले. दोघांनीही आपल्या वाढत्या वयात आणि एव्हाना आलेल्या रसिकांच्या नवीन पिढीचे भरभरून मनोरंजन केले.
दिलीपकुमारच्या आजारपणात सायरा बानूने त्याची अतिशय उत्तमरितीने काळजी घेत जगासमोर 'आदर्श पत्नी'चे उदाहरण घालून दिले. त्यात तिने कसलीही कचुराई केलेली नाही. दिलीपकुमारचे २ ऑक्टोबर १९६६ रोजी सायरा बानूशी लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी 'गोपी'पासून चित्रपटात एकत्र भूमिका करायला सुरुवात केली. तोपर्यंत ते एकदाही कोणत्याही चित्रपटात एकत्र आले नव्हते. त्यानंतर त्यानी सगिना, बैराग, दुनिया या चित्रपटातून एकत्र भूमिका केलीय. पण ते चित्रपट विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत.
दिलीप, देव आनंद व राज कपूर हे समकालीन ग्रेट कलाकार. म्हटलं तर एकमेकांचे स्पर्धक. तिघेही आपापल्या स्थानावर मजबूत. राज कपूरने दिग्दर्शनातही आपला ठसा उमटवला. देव आनंदने दिग्दर्शनात बरेच चित्रपट केलेत. त्यात हौसच. दिलीपकुमार मात्र दिग्दर्शक म्हणून आपले कर्तृत्व सिद्ध करु शकला नाही. हा चित्रपट पडद्यावर यायला हवा होता.
निर्माते सुधाकर बोकाडेनी दिलीपकुमारला दिग्दर्शक म्हणून 'कलिंगा'साठी संधी दिली. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील एका रात्री या 'कलिंगा'च्या भव्य मुहूर्ताला हजर राहण्याचे भाग्य मला लाभलेय. मुहूर्त दृश्य पार पडताच दिलीपकुमारने चक्क संपूर्ण पार्टीभर फेरी मारून जवळपास सर्वच पाहुणे व सिनेपत्रकारांची भेट घेतली. हा अनुभव मला विलक्षण सुखावणाराच ठरला.
२० एप्रिल ९१ ची ती रात्र होती. तर सायरा बानूने राष्ट्रीय दूरदर्शनसाठी एका चित्रपट गीताची मालिका तयार केली तेव्हा त्यानिमित्त आम्हा काही सिनेपत्रकारांना पाली हिलवरील दिलीपकुमारच्या प्रशस्त बंगल्यातील हिरवळीवर जाण्याचा आणि या दाम्पत्याच्या आठवणीत राहिल अशा मेहमान नवाझीचा अनुभव घेता आला. तेव्हा बंगल्यात लावलेल्या दिलीपकुमारच्या जुन्या चित्रपटाच्या भव्य फोटो फ्रेम्स या महान अभिनेत्याची ओळख पटवून देत होत्या. त्या तस्वीरी जणू त्याचे मोठेपण सांगत होत्या.
आयुष्याच्या अखेरीस दिलीपकुमारला आजारपणाचा खूपच मोठा सामना करावा लागला. अखेर ७ जुलै २०२१ ची सकाळ एका दु:खद बातमीने झाली.