पंढरपूर विकास आराखडा रहिवाशी व वारकऱ्यांच्या संमतीने- सुधीर मुनगंटीवार

0
पंढरपूर विकास आराखडा रहिवाशी व वारकऱ्यांच्या संमतीने- सुधीर मुनगंटीवार

पंढरपूर -(प्रतिनिधी) पंढरपूरच्या विकासासाठी राज्य सरकारने तयार केलेला प्रस्तावित विकास आराखडा तथा कॉरिडॉर करण्यामागची राज्य सरकारची भूमिका मी प्रथम समजावून घेईन व पंढरपूरचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा जपत चांगल्या पद्धतीने विकास करण्याची योजना राबविली जाईल. असे आश्वासन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य विकास मंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले. पंढरपूर विकास आराखड्याला विरोध करत तयार झालेल्या बचाव समितीच्या सदस्यांबरोबरच्या बैठकीमध्ये त्यांनी हे आश्वासन दिले.
              मुंबईतील मुनगंटीवार यांच्या शासकीय पर्णकुटी या निवासस्थानी बचाव समितीच्या सदस्यांबरोबर पंढरपूरच्या कॉरिडॉर संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पंढरपूरच्या विकासाला आमचा विरोध नसून पंढरपुरात यापूर्वी अनेकदा मंदिर परिसरात रस्ता रुंदीकरण झालेले आहे, आणखी एकदा त्याच परिसरात रस्ता रुंदीकरण करण्याऐवजी मंदिर परिसरात शासनाच्या असणाऱ्या जागांवर व नदीपलिकडे वारकऱ्यांसाठी सुविधा द्याव्यात व सुधारित विकास आराखडा तथा कॉरिडॉर रद्द करावा अशी मागणी बचाव समितीच्या सदस्यांनी केली.
             प्रस्तावित विकास आराखड्याची सरकारने अंमलबजावणी केल्यास पंढरपुरातील मंदिर परिसर उध्वस्त होईल, हजारो लोकांची रोजीरोटी जाईल व राहण्याची घरे देखील जातील. तेथील पुरातन वास्तू देखील उध्वस्त होऊन पंढरपूरची पुरातन, धार्मिक व सांस्कृतिक ओळख संपून जाईल अशा प्रकारची माहिती या प्रसंगी बचाव समितीचे सदस्य श्री.कौस्तुभ गुंडेवार, श्री.राजेंद्र वट्टमवार व डॉ.सचिन लादे यांनी दिली. याप्रसंगी सुधीरभाऊंनी अनेक प्रश्न विचारून संपूर्ण माहिती जाणून घेतली. प्रस्तावित कॉरिडॉर करण्यासंदर्भातील राज्य सरकारची नक्की भूमिका काय आहे हे मी समजून घेईन, त्यानंतर हा कॉरिडॉर करत असताना पंढरपुरातील धार्मिक व सांस्कृतिक वारसा नष्ट होऊ न देता परंतु वारकऱ्यांच्या सुविधांचा विचार करत या प्रस्तावित विकास आराखड्यामध्ये तेथील नागरिकांशी संवाद साधून बदल केले जातील अशा प्रकारचे आश्वासन श्री मुनगंटीवार यांनी दिले. पंढरपुरातील इतर विकास कामांंबाबत, वारकरी सुविधांबाबत त्यांनी बचाव समितीच्या सदस्यांशी आस्थेवाईकपणे चौकशी केली. याप्रसंगी पंढरपूर येथील बचाव समितीचे सदस्य श्री.बाळासाहेब कौलवार, लक्ष्मीकांत कोले, अविनाश नलबिलवार, विठ्ठल कटकमवार, नितीन गंजेवार, दत्तात्रय कौलवार, प्रशांत नलबिलवार, रोहित गुज्जलवार, राहुल पारसवार व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !