सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण पेटलंय ; हजारो मनसैनिक शेगावच्या दिशेनं ;

0

सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण  पेटलंय ; हजारो मनसैनिक शेगावच्या दिशेनं ;  

काँग्रेस तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे  नेते येथे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र २ दिवसांपासून एका वेगळ्याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय. त्यामुळे आजच्या राहुल गांधींच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे लागले आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण चांगलंच पेटलंय. काँग्रेसव्यतिरिक्त पक्षांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्यभरात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनाकडून आंदोलन केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यानंतर ठाण्यासह कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बीड आदी शहरांमधून राहुल गांधी यांच्याविरोधात जोडे मारा आंदोलन करण्यात आलं. तर पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्यापुढे 'माफीवीर' असा मजकूर लिहिल बॅनरबाजी केल्याने पुण्यातलं वातावरणही तापण्याची चिन्ह आहेत.

राहुल गांधींच्या याच वक्तव्यावरून भाजप, मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने निघाले आहेत. औरंगाबादमध्ये नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित आहेत. येथून मनसे कार्यकर्ते लवकरच शेगावच्या दिशेने निघणार आहेत. औरंगाबादहून निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांना वाटेत पोलिसांकडून धरपकड होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

शेगाव येथे दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहुल गांधींची सभा होणार आहे. येथे मोठ्या संख्येने काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, कार्यकर्ते जमणार आहेत. जवळपास ५ लाखांची गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मनसे, भाजप आक्रमक झाल्याने हाजरोंच्या संख्येने आंदोलनकर्तेही येथे जमा होत आहेत. ऐन थंडीत राजकीय वातावरण तापल्याने पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखणाचे मोठे आव्हान आहे. शेगावमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुण्यातून मनसेचे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे दुपारच्या सभेपर्यंत काही राजकीय राडा घडतो की काय, अशी शक्यता पाहता, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोलीत सावरकरांविरोधात केलेली वादग्रस्त वक्तव्यं आणि त्यांच्या अपमानाप्रकरणी राहुल गांधींना अटक करण्याची मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली" अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !