जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९७ शाळा आहेत. त्याअंतर्गत दोन लाख सहा हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढावे, यादृष्टीने शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सध्या दशसूत्रीवर भर दिला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी जिल्ह्यातील दोन हजार ७९२ मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेतली. त्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य व गुणवत्तेलाच अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या ग्रामीण व शहरात कोरोनाचे जवळपास २२९ रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर आजारी मुलांना शाळेत येण्याची सक्ती करू नका, अशा सूचना मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. शाळेत आलेला विद्यार्थी आजारी असल्यास त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला त्याच्या घरापर्यंत सोडा, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना सांगितले आहे. शाळांची पटसंख्या, पटनोंदणी १०० टक्के व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९७ शाळांमध्ये यंदा तब्बल चार हजार विद्यार्थी वाढले असून, त्यात काही विद्यार्थी इंग्रजी माध्यमाची आहेत. परंतु, १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असताना अजूनही २० टक्के मुले शाळेत येत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शाळेत न येण्याची कारणे शोधा, अशाही सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना दिल्या आहेत. दरम्यान, नुकताच जिल्हाभर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्व्हे झाला, त्यात ७० पेक्षा अधिक मुले आढळली आहेत. कोरोनामध्ये काही पालकांनी स्थलांतर केल्यानेही काही विद्यार्थी शाळेत येत नसल्याचे चित्र आहे.
पावसाळा आणि वातावरण बदलामुळे काही विद्यार्थी आजारी आहेत. त्यामुळे शाळांमधील उपस्थिती १०० टक्के नसल्याची स्थिती आहे. पण, शिक्षकांनी आजारी मुलांना शाळेत येण्याची सक्ती करू नये. तो विद्यार्थी बरा झाल्यावर नियमित शाळेत येऊ शकतो.