स्वेरी एम.बी.ए. च्या आठ विद्यार्थ्यांची ‘स्टेट स्ट्रीट एचसीएल सर्व्हीसेस लिमिटेड’ मध्ये निवड
पंढरपूरः- गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत असलेल्या एम.बी.ए.मधील आठ विद्यार्थ्यांची ‘स्टेट स्ट्रीट एचसीएल सर्व्हीसेस लिमिटेड’ या कंपनीत कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे. अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
स्वेरीने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.बी.ए. ची गुणवत्ता आणि महत्व पदवी अभियांत्रिकी प्रमाणेच टिकवून ठेवले आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे एम.बी.ए.च्या आठ विद्यार्थ्यांची निवड ‘स्टेट स्ट्रीट एचसीएल सर्व्हीसेस लिमिटेड’ कंपनीमध्ये नुकतीच करण्यात आली. ‘स्टेट स्ट्रीट एचसीएल सर्व्हीसेस लिमिटेड’ कंपनीचे अधिकारी व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या एम.बी.ए. विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून एम.बी.ए.च्या अंतिम वर्षातील रसिका महेश देशमुख, गीता बाळासाहेब क्षीरसागर, प्रथमेश रमेश हजारे, सौरभ दशरथ चौरे, ऐश्वर्या योगेश विरधे, सोनम मनोहर रणदिवे, वैभव रमेश मोरे व अनुष्का ज्ञानेश्वर साळुंखे या आठ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. श्री. विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कंपनीला नेमके कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात? याचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्युड, कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल स्कील, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्युव्ह यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मध्ये देखील स्वेरीने आघाडी घेतली आहे. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव असताना देखील तब्बल ६०० पेक्षा अधिक नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यात आल्या. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकीकडे स्वेरीने प्रवेश प्रक्रियेत व वार्षिक परीक्षेच्या निकालात मारलेली गरुड झेप दिसून येते तर दुसरीकडे स्वेरी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’ चे ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या आठही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.