स्वेरी कडून येत्या २० मार्च पासून ऑनलाईन सीईटी ‘क्रॅश कोर्स’चे आयोजन
बारावी सायन्सचे विद्यार्थी करू शकतात एमएचटी-सीईटी ची ऑनलाईन तयारी
पंढरपूर– ‘स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर कडून येत्या सोमवार, दि.२० मार्च २०२३ पासून ते सोमवार, दि. १० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन सीईटी ‘क्रॅश कोर्स’चे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये अभियांत्रिकी प्रवेशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तीन विषयांवर स्वेरीतील तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. हा ‘क्रॅश कोर्स’ मोफत असून यामध्ये बारावी सायन्सची परीक्षा दिलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तसेच या ‘क्रॅश कोर्स’ नंतर मॉक सीईटीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनी या अनमोल संधीचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले आहे.
शासनाच्या सी.ई.टी. सेलकडून बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा साधारण मे महिन्यात घेतली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी- सीईटी २०२३ या परीक्षेची तयारी कशी करावी? हा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना अनुसरून ‘स्वेरी’ नेहमीच नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत आलेली आहे. अशाच उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘स्वेरी’ने बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी या मोफत ऑनलाईन ‘क्रॅश कोर्स’चे आयोजन केले आहे. 'विद्यार्थ्यांना या ऑनलाइन ‘क्रॅश कोर्स’च्या माध्यमातून ‘एमएचटी- सीईटी २०२३’ या परीक्षेच्या तयारीची व सरावाची संधी मिळणार आहे.’ अशी माहिती प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने या परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी सीईटी पोर्टल ही सुरू केले आहे. cet.sveri.ac.in या पोर्टलवरील प्रॅक्टिस टेस्टस् ऑनलाईन पद्धतीने सोडवून विद्यार्थ्यांना या परीक्षेचा सराव करता येतो. विद्यार्थी इंटरनेटशी जोडलेल्या कॉम्प्यूटर, लॅपटॉप तसेच स्मार्ट फोनचा वापर करून देखील हे सराव प्रश्न सोडवू शकतात. बहुतेकदा विद्यार्थ्यांना पेन व पेपरच्या सहाय्याने परीक्षा देणे सवयीचे असते. त्यामुळे कॉम्प्युटरवर ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना ते कठीण जाते. या पोर्टल वरील प्रत्येक प्रश्नसंच सोडवण्यासाठी ठराविक वेळ दिलेली आहे. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे आहेत ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून चार पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्यायाला क्लिक करून विद्यार्थी आपले उत्तर निवडू शकतात व याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. टेस्ट सोडवून झाल्यानंतर आपण सोडवलेल्या प्रश्नांची चुकीची व बरोबर उत्तरे यांची पडताळणी देखील विद्यार्थी या सराव पोर्टलद्वारे करू शकतात. तरी, या सुविधेचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी या क्रॅश कोर्स साठी आपले नाव नोंदवण्यासाठी व काही अडचणी असल्यास मोबा.नं.–८९२९१००६१३ व ९५९५९२११५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी केले आहे.
