कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट

मध्य महाराष्ट्र, कोकणाला यलो अलर्ट 

प्रतिनिधी :  मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा दणका सुरू असतानाच उर्वरित राज्यात मात्र पाऊस ओसरला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणकेडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज कायम आहे.

उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. अंदमान समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा तडाखा कायम आहे. नगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत गुरूवारी (ता. २०) विजा, मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे. नगर, पुणे, नाशिकला पावसाचा जोर अधिक होता. नगर जिल्ह्यातील राहाता येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. २१) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

चक्रीवादळ निर्मितीची शक्यता
बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. २२) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रणाली उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल बांग्लादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) 
कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

Post a Comment

Previous Post Next Post